सिंधुदुर्गातील मायनिंगला मनसेचा जाहीर निषेध....आजगाव-धाकोरे ड्रोन सर्वेविरोधात आक्रमक पवित्रा  

सिंधुदुर्गातील मायनिंगला मनसेचा जाहीर निषेध....आजगाव-धाकोरे ड्रोन सर्वेविरोधात आक्रमक पवित्रा  

कुडाळ

 


      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनसामान्यांचा विरोध डावलून सत्तेच्या जोरावर मायनिंगचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. चुकीच्या पद्धतीने स्वतःच्या गावात झालेल्या ड्रोन सर्वेला विरोध केल्यामुळे पायी दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी मनसेने केली आहे.आजगाव-धाकोरे परिसरात काल रात्री जे. एस. डब्ल्यू कंपनीकडून ड्रोन कॅमेरा मार्फत सर्वे सुरू होता. त्यामुळे या जिल्ह्यात पुन्हा कळणे पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा सवाल मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी उपस्थित केला. सावंतवाडी विधानसभेचे आमदार दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील ही गावे असून, पूर्वी दहशतवाद दहशतवाद म्हणून आवाज उठवणारे आज या विषयावर बोलतील का, असा प्रश्नही त्यांनी विचारला.धाकोरे आणि आजगावच्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत मायनिंगच्या विरोधात बहुसंख्येने ठराव घेतला असतानाही, त्या ठिकाणी अनधिकृत सर्वेचा रेटा सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप किनळेकर यांनी केला. जिल्ह्यातील राज्यकर्त्यांच्या वरदहस्तामुळेच बाहेरून येऊन सर्वे करण्याची हिम्मत या कंपन्यांना होत आहे. जिल्हा खनिकर्म अधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांना याची कल्पना नाही का, असेही त्यांनी विचारले. स्थानिक आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. मायनिंगला आपला पाठिंबा आहे की नाही हे त्यांनी जाहीर करावे, अशी मागणी किनळेकर यांनी केली. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या भाडेवाढीला स्थगिती मिळवण्यासाठी आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्याच पद्धतीने मुख्यमंत्र्यांना भेटून हा प्रस्तावित मायनिंग आपल्या मतदारसंघातून बंद करण्यासाठी प्रयत्न करतील का, असा सवालही त्यांनी केला.महाराष्ट्र नवनिर्माण सेने यापूर्वी वेंगुर्ला मठ सिलिका मायनिंगची जनसुनावणी उधळून लावली आणि मुंबईतील कार्यालय फोडले. त्याच पद्धतीने जे. एस. डब्ल्यू च्या बाबतीतही आता करावे लागेल, असे किनळेकर म्हणाले. पर्यावरण प्रेमींवर होणारी वक्तव्ये अशोभनीय आहेत. त्यामुळे सर्वांनी राखणदार पदयात्रेत सहभागी होऊन सिंधुदुर्गाची एकजूट दाखवावी आणि विनाशकारी प्रकल्पांना विरोध करावा, असे आवाहन त्यांनी केले.  काल मायनिंग कंपन्यांची दादागिरी आजगाव-धाकोरे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी हाणून पाडली. त्यांच्या एकजुटीचे कौतुक करत मनसे त्यांच्या सोबत कायम राहील, असा विश्वास कुणाल किनळेकर यांनी दिला.