कोकण रेल्वेची तिकीट तपासणी मोहीम तीव्र; एका महिन्यात ३७ हजार विनातिकीट प्रवासी आढळले
रत्नागिरी
कोकण रेल्वे प्रशासनाने विनातिकीट व अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र केली असून एप्रिल २०२६ महिन्यात ९३४ विशेष तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. या मोहिमांदरम्यान ३७ हजार विनातिकीट अथवा अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची प्रकरणे आढळून आली असून त्यांच्याकडून रेल्वे भाडे व दंडापोटी तब्बल २ कोटी ९० लाख रुपयांची वसुली करण्यात आली.कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एकूण ११ हजार ३९४ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. या मोहिमांमध्ये ४ लाख ९९ हजार ६७५ विनातिकीट अथवा अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची प्रकरणे उघडकीस आली.या सर्व कारवायांमधून रेल्वे भाडे आणि दंडाच्या स्वरूपात एकूण २७ कोटी ६८ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. रेल्वेच्या महसूल संरक्षणासाठी तसेच नियमबाह्य प्रवासाला आळा घालण्यासाठी ही मोहीम प्रभावी ठरत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.प्रवाशांनी प्रवासादरम्यान होणारा त्रास टाळण्यासाठी नेहमी वैध तिकीटासह प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे. आगामी उन्हाळी सुट्टीच्या हंगामात रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या समन्वयाने संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावर विशेष तिकीट तपासणी मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे. यामुळे प्रामाणिक प्रवाशांना सुरक्षित, सुलभआणि आरामदायी प्रवासाचा लाभ मिळणार आहे.
konkansamwad 
