रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा
मुंबई
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नाशिक येथील खरात याच्या अश्लील कृत्यांचे प्रकरण समोर आल्यानंतर चाकणकर या त्याच्या भक्त असल्याचे फोटो आणि चित्रफिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या होत्या. महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या व्यक्तीसोबत आयोगाच्या अध्यक्षांचे नाव जोडले गेल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती आणि राजीनाम्यासाठी मोठा दबाव निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर आज रुपाली चाकणकर यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपला राजीनामा त्यांच्याकडे सोपविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्यांनी वैयक्तिक कारणास्तव आणि स्वेच्छेने आपण पद सोडत असल्याचे नमूद केले आहे. १५ ऑक्टोबर २०२४ ला त्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र खरात याला अटक झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर टीकेचा भडीमार सुरू केला होता. या प्रकरणाला नवे वळण तेव्हा मिळाले जेव्हा शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका पीडितेचा हवाला देत गंभीर आरोप केले. चाकणकर या स्वतः तंत्र-मंत्र विद्या करत होत्या आणि त्यांनी आपली अनामिका देखील कापली होती, असा खळबळजनक दावा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनीही त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या असल्याने या वादामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत होती. अखेर या सर्व दबावामुळे आणि वाढत्या विरोधामुळे त्यांनी आज आपला पदभार सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
konkansamwad 
