गोव्याहून पुण्यात बेकायदेशीर दारू वाहतूक करणारी स्विफ्ट कार जप्त
आंबोली
गोवा येथून पुण्याच्या दिशेने मारुती स्विफ्ट कारमधून बेकायदेशीररीया होणारी गोवे बनावटीच्या बिअरची वाहतूक आंबोली पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा धाड टाकून पकडली. या कारवाईत पोलिसांनी २१ हजार ३६० रुपये किमतीच्या बिअरच्या टीन्ससह मारुती स्विफ्ट गाडी असा एकूण ४ लाख २१ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कार चालकावर दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्ञानेश्वर मारुती चिंतोळे (वय २१, सध्या रा. रांजणगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मूळ रा. लोहा, जिल्हा नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबोली पोलीस चेकपोस्टवर पोलिसांचे पथक वाहनांची तपासणी करत होते. यावेळी गोवा बाजूकडून पुण्याच्या दिशेने येणारी मारुती स्विफ्ट कार (गाडी क्रमांक MH 12 JC 5640) संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी ती थांबवली. कारची झडती घेतली असता, त्यात गोवे बनावटीच्या बिअरचे टीन्स आढळून आले. या दारू वाहतुकीबाबत चालकाकडे कोणताही परवाना किंवा कायदेशीर कागदपत्रे नव्हती. पोलिसांनी कारवाई दरम्यान २१ हजार ३६० रुपयांची बेकायदेशीर बिअर आणि वाहतुकीसाठी वापरलेली मारुती स्विफ्ट कार असा एकूण ४ लाख २१ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी ज्ञानेश्वर चिंतोळे याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील, पोलीस हवालदार संतोष गलोले, मनीष शिंदे, रामदास जाधव, काळे, परब आणि होमगार्ड जंगले व बरगडे यांच्या पथकाने केली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
konkansamwad 
