सुशांत नाईक, संकेत नाईक यांना नगरसेवक पद राणेंच्या आशीर्वादामुळेच - समीर नलावडे

सुशांत नाईक, संकेत नाईक यांना नगरसेवक पद राणेंच्या आशीर्वादामुळेच - समीर नलावडे

कणकवली

 

     नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक आणि त्यांचे बंधू नगरसेवक संकेत नाईक यांना मिळालेले पद हे पूर्णपणे राणे कुटुंबीयांच्या आशीर्वादामुळेच मिळालेले आहे, हे आता सिद्ध झाले आहे. ज्यांच्या कृपाशीर्वादाने तुम्ही खुर्चीत बसलात, त्याच राणे कुटुंबावर टीका करणे नैतिकतेला धरून नाही. त्यामुळे नाईक बंधूमध्ये थोडी जरी नैतिकता आणि लाज उरली असेल, तर त्यांनी आपल्या नगरसेवक पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, असे थेट आव्हान कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिले आहे.जर राजीनामा देण्याची हिंमत नसेल, तर यापुढे राणे कुटुंबीयांवर टीका करण्याची तरी हिंमत करू नये, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. माध्यमांशी बोलताना समीर नलावडे यांनी नाईक कुटुंबीयांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, सुशांत नाईक आणि संकेत नाईक हे केवळ राणेंच्या नेतृत्वामुळे आणि त्यांच्या जीवावरच निवडणुकीत निवडून आले आहेत. निवडणुकीच्या काळात तुम्हाला राणेंचे पैसे चालतात आणि त्यांचेच नेतृत्व मान्य करून तुम्ही पदावर बसता. नाईक यांच्या घरातील व्यक्ती २००८ पूर्वी उपनगराध्यक्ष होती, त्यानंतर राणेंची साथ नसती तर आजपर्यंत कधीही त्यांना हे पद मिळाले नसते, असा टोला नलावडे यांनी लगावला.आमदार निलेश राणे यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्याचा हवाला देत समीर नलावडे यांनी आमदार वैभव नाईक यांनाही खुले आव्हान दिले. नाईक कुटुंबीयांनी राणेंच्या उपकाराची जाणीव ठेवावी, असे सांगत त्यांनी सुशांत नाईक आणि संकेत नाईक यांना पदाचे राजीनामे देऊन पुन्हा एकदा जनतेमधून निवडून येऊन दाखवावे, असे म्हटले आहे. राजीनामे दिल्यानंतर पुन्हा कोण निवडून येते ते आपणही बघू, अशा शब्दांत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नाईक बंधूंना आणि आमदार वैभव नाईक यांना घेरले आहे.