उपजिल्हा रुग्णालयाच्या जागीच उभारणार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल....दीपक केसरकरांची घोषणा
सावंतवाडी
सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सध्याच्या जागेवरच आता अद्यावत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाईल, असा महत्त्वपूर्ण दावा आमदार आणि माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. केसरकर म्हणाले की, जिल्ह्यात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची संकल्पना त्यांनीच आणली, मात्र राजघराण्यातील सदस्यांच्या स्वाक्षऱ्या वेळेत न मिळाल्याने हे काम रखडले होते. आता जुन्या जागेवरच हे रुग्णालय उभारून कामाला गती दिली जाईल. सिंधुदुर्गातील कंत्राटदारांच्या कामाच्या दर्जाबद्दल नाराजी व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, निधी उपलब्ध असूनही निकृष्ट कामांमुळे अनेक प्रकल्प रखडले आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांबाबत बोलताना केसरकर यांनी एका नवीन योजनेची माहिती दिली. जिल्ह्यात काम करण्यास तयार असलेल्या डॉक्टरांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अतिरिक्त वेतन देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यामुळे डॉक्टरांच्या कमतरतेचा प्रश्न सुटू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन चतुर्थ श्रेणी कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या आरोग्य दरबारात स्थानिक नागरिकांनी आरोग्याशी संबंधित विविध प्रश्न मांडले. वाफोलीचे गुणेश गवस यांनी निवडणुकीतील आश्वासनांची आठवण करून दिली, सुर्या पालव यांनी डायलिसिस सुविधेच्या गरजेवर भर दिला. यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोग्य व्यवस्थेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते. या दरबारात चैताली तेंडुलकर या २० वर्षीय दिव्यांग तरुणीने आपली आपबिती मांडली तेव्हा संपूर्ण सभागृह हेलावून गेले. लहानपणी वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे आपल्याला कायमचे अपंगत्व आले, अशी व्यथा तिने मांडली. माझ्यावर जी वेळ आली ती इतर कोणत्याही मुलावर येऊ नये, अशी आर्त हाक तिने प्रशासनाला दिली. या घटनेमुळे जिल्ह्यातील आपत्कालीन आरोग्य सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
konkansamwad 
