गर्दीचा फायदा घेत महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

गर्दीचा फायदा घेत महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

कुडाळ

 

    एसटी बसमध्ये चढताना होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या पर्समधील सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना कुडाळ बसस्थानकात घडली आहे. याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मूळच्या मालवण तालुक्यातील रहिवासी असलेल्या आणि सध्या मुंबईत वास्तव्यास असलेल्या पीडित महिला आपल्या पतीसोबत गावी एका धार्मिक कार्यक्रमासाठी आल्या होत्या. रेल्वेने कुडाळ स्थानकात उतरल्यानंतर त्यांनी आपल्याकडील दागिन्यांचे पाऊच सुरक्षित असल्याची खात्री केली आणि त्यानंतर त्या रिक्षाने कुडाळ बसस्थानकात पोहोचल्या. दुपारी मालवणकडे जाणारी बस फलाटावर लागली असता, प्रवाशांची मोठी गर्दी होती. बसमध्ये चढत असतानाच चोरट्याने त्यांच्या पर्सची चैन चलाखीने उघडून आतील सोन्याच्या दागिन्यांचे पाऊच लंपास केले. बसमध्ये सीटवर बसल्यानंतर महिलेला आपल्या पर्सची चैन अर्धवट उघडी असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने तपासणी केली असता दागिन्यांचे पाऊच चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असून, त्यात मंगळसूत्र, लक्ष्मीहार, हातातील बांगड्या, अंगठी आणि कानातले बट्टू यांचा समावेश आहे. या एकूण दागिन्यांची किंमत सुमारे २ लाख ५५ हजार रुपये आहे. या घटनेची तक्रार कुडाळ पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सखाराम भोई या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. भरदुपारी गजबजलेल्या बसस्थानकात ही चोरी झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रवासादरम्यान आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.