देशभक्तीचा उत्सव आणि माजी सैनिकांचा सन्मान - वेंगुर्ल्यात ८० वा स्वातंत्र्य दिन दिमाखात

देशभक्तीचा उत्सव आणि माजी सैनिकांचा सन्मान - वेंगुर्ल्यात ८० वा स्वातंत्र्य दिन दिमाखात

 


वेंगुर्ला


      भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन वेंगुर्ला नगरपरिषदेच्या क्रॉफर्ड मार्केट इमारतीच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. यानंतर देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या माजी सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. माजी सैनिक श्री. राजेश कृष्णा हिरोजी आणि श्री. विनायक जयराम परब यांचा नगराध्यक्ष श्री. दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष श्री. सुहास गवंडळकर आणि मुख्याधिकारी श्री. हेमंत किरुळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.यावेळी माजी सैनिकांच्या देशसेवेबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले. देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी सैनिकांनी केलेल्या त्यागाचे स्मरण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.स्वातंत्र्य दिनानिमित्त मान्यवरांनी नागरिकांना शुभेच्छा देत स्वच्छ आणि सुंदर वेंगुर्ला शहरासाठी तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाला नगरसेवक, नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, माजी सैनिक आणि नागरिक उपस्थित होते. देशभक्तीपर घोषणा आणि देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारले होते.