संत राऊळ महाराज महाविद्यालय येथे प्रथमोपचार व आरोग्य सुविधा कक्षाचे उद्घाटन
कुडाळ
विद्यार्थी आणि प्राध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी प्रथमोपचार तातडीने मिळावेत यासाठी संत राऊळ महाराज महाविद्यालयाने आरोग्यदायी उपक्रम हाती घेतला आहे. प्रसिद्ध डॉक्टर जी. टी. राणे यांच्या हस्ते प्रथमोपचार आरोग्य सुविधा कक्षचे उद्घाटन करून या उपक्रमाचा प्रारंभ झाला. महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग निरोगी रहावा याकरिता प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी राणे हॉस्पिटल ॲन्ड मेडिकल रिसर्च, कुडाळ या संस्थेबरोबर सामंजस्य करार महाविद्यालयाने केला आहे. या अंतर्गत वार्षिक आरोग्य तपासणीसाठी विविध मूलभूत चाचण्या, आवश्यकतेनुसार विशेष तपासणी चाचण्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला या सुविधा पुरवण्यात येणार आहेत. याचा खर्च संस्थेच्यावतीने केला जाईल असे यावेळी क.म.शि.प्र.मंडळाचे सहकार्यवाह महेंद्र गवस यांनी सांगितले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ.जी.टी. राणे यांनी बदलती जीवन शैली आणि बाजारी निकृष्ट दर्जाचे खाणे यांचा आरोग्यावर होणारा परिणाम आणि त्यामुळे शरीराकडून मिळणारे संकेत ध्यानात घेऊन नियमित आरोग्य तपासणीची गरज व उपाय याविषयी मार्गदर्शन केले. तसेच निव्वळ तपासणी चाचण्यातून पूर्णपणे समस्या सुटतात असे नाही याचीही जाणीव करून दिली. राणे हॉस्पिटल अॅन्ड मेडिकल रिसर्चतर्फे महाविद्यालयाला दिव्यांगांसाठीची चाकाची खुर्ची भेट म्हणून दिलेली आहे. सुरुवातीला प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. डॉ रवींद्र ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.

konkansamwad 
