कुडाळमध्ये 'शिवराज भूषण' महानाट्याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कुडाळ
मालवणच्या श्री शिवराज मंचच्या कलाकारांनी सादर केलेल्या 'शिवराज भूषण' या महानाट्याने कुडाळकर रसिकांवर अक्षरशः गारुड केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य पराक्रम आणि महाकवी भूषण यांनी ब्रज भाषेत लिहिलेल्या 'शिवभूषण' ग्रंथातील ३८० छंदांपैकी निवडक २१ छंद या नाटकातून सादर करण्यात आले. कवी भूषण यांची मुख्य भूमिका साकारणारे भूषण साटम यांनी आपल्या कसदार अभिनयातून आणि ब्रज भाषेतील वीररसपूर्ण छंदांतून रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला. कुडाळ येथील बाबा वर्दम स्मृती रंगमंचावर पार पडलेला हा सातवा प्रयोग हाऊसफुल्ल गर्दीत संपन्न झाला, ज्याने प्रेक्षकांना इतिहासाचा जिवंत अनुभव दिला.या महानाट्याचा शुभारंभ माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, तहसीलदार सचिन पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत यांच्यासह नाटकाचे लेखक रणजित हिर्लेकर, दिग्दर्शक गणेश मेस्त्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. प्रमोद जठार यांनी या कलाकृतीचे कौतुक करत भूषण साटम यांचा विशेष गौरव केला. निवेदक संजय शिंदे यांच्या पहाडी आवाजातील कथानकाने नाटकाची सुरुवात झाली आणि पहिल्या क्षणापासून प्रेक्षकांना खिळवून ठेवले.नाटकाचे प्रमुख आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेले किशोर सरनोबत यांचा प्रभावी वावर आणि भूषण साटम यांनी लीलया पेललेले ब्रज भाषेतील कठीण छंद. या महानाट्यात महाराजांच्या जीवनातील अफझलखान वध, पावनखिंड लढाई, शाहिस्तेखानावरील हल्ला आणि विशेषतः कुडाळच्या खवासखानाविरुद्धच्या लढाईचा प्रसंग दाखवण्यात आला. आधुनिकतेची जोड म्हणून या नाटकात एआय (AI), चॅट जीपीटी आणि भव्य एलईडी स्क्रीनचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे कैलास लेण्यातील शंकर-पार्वती नृत्य आणि रायगडाचा सोहळा अधिक वास्तववादी वाटला.मालवण आणि कुडाळमधील ८२ कलाकारांच्या मेहनतीने उभा राहिलेला शिवराज्याभिषेक सोहळा या नाटकाचा कळस ठरला. यावेळी मालवणच्या स्वराज ढोल पथकाने केलेल्या ढोलगर्जनेने संपूर्ण नाट्यगृह शिवमय झाले होते. कवी भूषण यांच्या ग्रंथावर आधारित हे भारतातील पहिलेच महानाट्य असल्याचा विश्वास भूषण साटम यांनी व्यक्त केला आहे. रत्नागिरी, मालवण आणि वेंगुर्ला येथील यशानंतर कुडाळमध्येही या प्रयोगाने इतिहास जिवंत केल्याच्या भावनेने रसिकांनी समाधान व्यक्त केले.
konkansamwad 
