राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार ?......नववी- दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक!
मुंबई
खासगी अनुदानित माध्यमिक शाळांसह प्राथमिक शाळांची २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील संचमान्यता अंतिम टप्प्यात आहे. मात्र, माध्यमिक विभागाकडील अडीच हजार आणि खासगी प्राथमिकच्या सुमारे पाचशे शाळांनी अनुदानाचा प्रकार, शाळांचे माध्यम, मंजूर व कार्यरत पदे, पटसंख्या याची माहिती अद्याप दिलेली नाही. या शाळांना माहिती देण्यासाठी शिक्षण संचालकांनी मुदत दिली आहे. मुदतीत माहिती न देणाऱ्या शाळांमधील सर्वांचेच पगार मार्चपासून थांबविले जाणार आहेत.२०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील पटसंख्येनुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांची सध्या संचमान्यता केली जात आहे. १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार संचमान्यतेनंतर पहिल्यांदा अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल. त्यानंतर खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील रिक्त पदांची भरती होईल. त्याचवेळी राज्यातील जिल्हा परिषदांच्या ६५ हजार शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा, जिल्ह्याअंतर्गत बदल्या होतील. १५ जूनपूर्वी या सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहेत.या पार्श्वभूमीवर प्राथमिक व माध्यमिक-उच्च माध्यमिक विभागाच्या संचालकांनी सर्व खासगी अनुदानित शाळांमधील पटसंख्या आणि रिक्त- अतिरिक्त शिक्षकांची माहिती मागविली आहे. पण, अद्याप तीन हजार शाळांनी माहिती दिलेली नाही. या आठवड्यात माहिती न दिल्यास त्या शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार थांबविला जाणार असून तसा इशारा शिक्षण संचालकांनी दिला आहे.सध्या संचमान्यतेची कार्यवाही सुरू असून माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडील १७ हजारांपैकी सुमारे अडीच हजार शाळांची माहिती अप्राप्त आहे. त्यांना माहिती देण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. मुदतीत माहिती न दिल्यास मार्चपासून त्या शाळांचा पगार थांबू शकतो.डॉ. श्रीराम पानझडे, सहसंचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, पुणे नववी-दहावीच्या वर्गासाठी किमान २० पट असावा, अशी अट आहे. १५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेच्या शासन निर्णयानुसार २० पेक्षा कमी पटाचे वर्ग तथा शाळा आता बंद कराव्या लागणार आहेत. तत्पूर्वी, या वर्गांसाठी घातलेली पटाची अट शिथिल करावी, असा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने शालेय शिक्षण विभागाचा १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय ग्राह्य मानल्याने आता २० पटाच्याच वर्गांतील तथा शाळांमधील शिक्षक कार्यरत राहतील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

konkansamwad 
