'विद्यार्थ्यांचे भावनिक आरोग्य जपा' - पाटच्या शिक्षकांसाठी डॉ. रुपेश पाटकर यांचे मार्गदर्शन
पाट
कुमारवयीन विद्यार्थ्यांचे भावनिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य जपण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या वर्तनातील सूक्ष्म बदल ओळखून त्यांना वेळीच आधार देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मनोविकास तज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी केले.बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने "कुमारवयीन मुलांचे भावनिक आरोग्य रक्षण - मनमित्र" या उपक्रमांतर्गत शनिवारी पाट हायस्कूल येथे शिक्षकांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. यात पाट हायस्कूलसह परुळे, माड्याची वाडी आणि केळूस हायस्कूलच्या शिक्षकांनी सहभाग घेतला.सत्राच्या सुरुवातीला शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या भावनिक आरोग्यावरील प्रश्नावली देण्यात आली. त्यानंतर गटचर्चेद्वारे विद्यार्थ्यांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावर शिक्षकांनी घ्यावयाची भूमिका यावर सविस्तर चर्चा झाली.
डॉ. पाटकर यांनी दिले हे महत्वाचे मुद्दे
1. ऐका आणि समजून घ्या - विद्यार्थ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या, त्यांच्या समस्या कमी लेखू नका.
2. लक्षणे ओळखा - ताण, निराशा, एकटेपणा, नातेसंबंधातील गुंतागुंत ही भावनिक आरोग्य बिघडण्याची कारणे असू शकतात.
3. सुरक्षित वातावरण - शाळेत विश्वासाचे आणि निःपक्षपाती वातावरण तयार करा. गरज पडल्यास तज्ज्ञांची मदत घ्या.
4. 'नाही' म्हणायला शिकवा - अपयश, नकार स्वीकारण्याची क्षमता आणि वस्तूंच्या किंमतीबरोबरच पालकांच्या कष्टाचे मूल्य विद्यार्थ्यांना समजावून सांगा.
5. भावनिक बुद्धिमत्ता - आकर्षण, मैत्री आणि प्रेम यातील फरक समजावून सांगून भावनेच्या भरात टोकाचे निर्णय न घेण्याची शिकवण द्या.
आत्महत्येचे विचार येण्यामागील कारणे आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी शिक्षकांनी काय काळजी घ्यावी यावरही विशेष भर देण्यात आला.या प्रसंगी बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, मुक्तांगण वेंगुर्ल्याच्या संचालिका सौ. मंगल परुळेकर, कार्योपाध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, सचिव श्री. खोबरेकर आणि संस्था सदस्य श्री. राजेश सामंत उपस्थित होते.संपूर्ण सत्र संवादात्मक पद्धतीने झाले. शिक्षकांनी विविध प्रश्न विचारून त्यांची शंका निरसन करून घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप साळसकर यांनी केले तर आभार श्री. राजेश सामंत यांनी मानले.विद्यार्थ्यांचे भावनिक आरोग्य जपणे ही केवळ पालकांची जबाबदारी नसून शाळा, शिक्षक, पालक आणि समाज यांच्या संयुक्त प्रयत्नांची गरज आहे, असा संदेश या "मनमित्र" उपक्रमातून देण्यात आला.
konkansamwad 
