दिवाळीपूर्वीच महागाईचा बॉम्ब; व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ

दिवाळीपूर्वीच महागाईचा बॉम्ब; व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ

मुंबई

 

   दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांसह व्यावसायिकांना महागाईचा मोठा दणका देण्यात आला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ जाहीर केली असून ही दरवाढ आजपासून लागू करण्यात आली आहे.इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतातही गेल्या काही महिन्यांपासून गॅस सिलेंडरचे दर वाढताना दिसत आहेत. आता त्यातच पुन्हा एकदा व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा भाव आता 2764 रुपये झाला असून घरगुती 14.2 किलोच्या सिलेंडरचा भाव 941.50 रुपये इतकाच कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे घरगुती वापरकर्त्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यवसाय करणाऱ्यांना मात्र या दरवाढीचा थेट फटका बसणार आहे.दुसरीकडे चेन्नईमध्ये आजपासून कमर्शियल सिलेंडरचा भाव 2994.50 रुपये करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात हाच भाव 2983 रुपये होता, म्हणजेच 11.50 रुपयांनी गॅस महाग झाला आहे. तेथे घरगुती सिलेंडरचा भाव 957.50 रुपये आहे. अहमदाबादमध्येही व्यावसायिक गॅस सिलेंडरचा भाव 2831.50 रुपयांवरून 2842 रुपये झाला आहे. अहमदाबादमध्येही घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. तर शिलांगमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा भाव 1007.50 रुपये असून व्यावसायिक सिलेंडरचा भाव आता 3091 रुपये झाला आहे.सणासुदीच्या काळातच ही दरवाढ झाल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. घरगुती सिलेंडरच्या किंमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नसली तरी व्यावसायिक सिलेंडर महागल्याने बाहेर जेवणाच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.