भाजपा सिंधुदुर्ग आयोजित प्रदर्शनीचे रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

वेंगुर्ला
वेंगुर्ला येथील कालेलकर हॉलमध्ये भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्गच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अहिल्याबाई होळकर त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष माहिती आणि चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत होते. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा उपाध्यक्ष व अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसन्ना देसाई, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, तालुका अध्यक्ष पपू परब, सुहास गवंडळकर, राजन गिरप, प्रशांत आपटे, राजु राऊळ, साईप्रसाद नाईक, सुषमा खानोलकर, सुजाता पडवळ, स्मिता दामले, शितल आंगचेकर तसेच नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदर्शनाच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनातील प्रमुख टप्प्यांचे, कार्याची दिशा दाखवणारे चित्रफलक, माहितीपटल सादरीकरण करण्यात आले. महिला, विद्यार्थी, नागरिक यांच्यात या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले, "अहिल्याबाई होळकर या केवळ एका राज्याच्या राणी नव्हत्या, तर त्या एक दूरदर्शी प्रशासक, स्त्रीशक्तीचा भक्कम आधार आणि समाजसुधारणेच्या प्रखर प्रेरणा होत्या. त्यांच्या विचारांची आजच्या समाजाला अत्यंत गरज आहे".कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ.सचिन परुळकर यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रसन्ना देसाई यांनी केले. स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि विविध संघटनांचे सदस्यांनी तसेच महिला वर्गाने प्रदर्शनाची प्रशंसा केली.