पावसाळ्यात विद्युत अपघात टाळा....महावितरणचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन....हेल्पलाईन क्रमांक जारी 

पावसाळ्यात विद्युत अपघात टाळा....महावितरणचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन....हेल्पलाईन क्रमांक जारी 

सावंतवाडी

 

 
      सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी पावसाळा आणि संभाव्य वादळ-वाऱ्याची परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने नागरिकांना विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित व सावधान राहण्याचे जाहीर आवाहन केले आहे.पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महावितरणने कुडाळ उपविभागातील अधिकारी व लाईन स्टाफचे संपर्क क्रमांकही जारी केले आहेत.  वादळ-वाऱ्यामुळे पावसाळ्यात विजेच्या तारा तुटणे, खांब वाकणे किंवा पडणे, रोहित्र कोसळणे, तसेच वीजतारांवर झाडे किंवा झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. ही संभाव्य भीषण आपत्ती टाळण्यासाठी पाऊस सुरू असताना नागरिकांनी रोहित्र, वीज खांब किंवा वीजतारांखाली थांबणे पूर्णपणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.  याशिवाय तुटलेल्या विजेच्या तारा, वीज खांब, स्टे वायर, वितरण रोहित्र आणि वितरणपेटी यांसह विद्युत यंत्रणेतील कोणत्याही उपकरणाला चुकूनही स्पर्श करू नये, अशी सतर्कतेची सूचना देण्यात आली आहे.कोणत्याही भागात तातडीची आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास तात्काळ नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. महावितरणचे 24 तास कार्यरत असणारे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध असून, नागरिक 1912 किंवा 19120 या क्रमांकावर, तसेच 1800-233-3435 आणि 1800-212-3435 या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधून तक्रार नोंदवू शकतात.  जिल्हा संनियंत्रण समितीचा कंट्रोल रूम क्रमांक 7875765019 यावरही संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.