सिंधुदुर्गच्या अल्पेश घारेची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप...कल्पकतेतून साकारलेल्या 'पंढरीच्या सोहळ्या'सह 'शिवरायांचे' भव्य चित्र अमेरिकेला रवाना

सिंधुदुर्गच्या अल्पेश घारेची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप...कल्पकतेतून साकारलेल्या 'पंढरीच्या सोहळ्या'सह 'शिवरायांचे' भव्य चित्र अमेरिकेला रवाना

कुडाळ

 

    सिंधुदुर्गच्या मातीत जन्माला आलेल्या आणि आपल्या कल्पकतेच्या जोरावर डिजिटल कलेच्या दुनियेत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलेल्या युवा डिजिटल कलाकार अल्पेश आत्माराम घारे याने आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा गौरव पुन्हा एकदा वाढवला आहे. पाट हायस्कूलचा माजी विद्यार्थी असलेल्या अल्पेशने अमेरिकेतील एका ग्राहकासाठी अत्यंत कल्पकतेने तयार केलेल्या तीन भव्य डिजिटल कॅनव्हास पेंटिंग्ज आता थेट अमेरिकेत पाठवल्या जाणार आहेत. यामध्ये यंदाच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर साकारलेला 'पंढरीचा सोहळा' परदेशातील नागरिकांसाठी विशेष लक्षवेधी ठरणार आहे.मुंबईत डिजिटल कॅनव्हास पेंटिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या अल्पेश घारे याच्या कल्पकतेतून तयार झालेल्या पेंटिंग्जला परदेशातूनही नेहमीच मोठी मागणी असते. यंदा पंढरपूरच्या वारी सोहळ्याच्या निमित्ताने हा मराठी मनाचा उत्सव डिजिटल कॅनव्हासवर साकारण्याची सुवर्णसंधी त्याला मिळाली. अमेरिकेतील भारतीय संस्कृतीप्रेमींसाठी त्याने तीन भव्य कलाकृती साकारल्या असून, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनावर विराजमान असलेले ८ बाय ८ फूट आकाराचे भव्य चित्र, वारीचा भक्तिभाव आणि वारकरी परंपरा दाखवणारे ९ बाय ५ फूट आकारातील पंढरपूरच्या विठ्ठल वारीचे भावपूर्ण चित्रण, तसेच अंबाजोगाईच्या श्री योगेश्वरी देवीचे ६ बाय ६ फूट आकारातील अत्यंत आकर्षक व विलोभनीय चित्र समाविष्ट आहे. महाराष्ट्राचा इतिहास, अध्यात्म आणि सांस्कृतिक वारसा यांचे अत्यंत बारकाईने आणि आधुनिक डिजिटल मॅट पेंटिंग व कॉन्सेप्ट आर्टच्या साहाय्याने केलेले हे चित्रण सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.अल्पेश घारे याने आपले कलेचे प्राथमिक शिक्षण 'पाट हायस्कूल'मध्ये घेतले होते. त्याच्या या दैदीप्यमान यशाबद्दल बोलताना शाळेचे कला शिक्षक संदीप साळसकर यांनी सांगितले की, पाट हायस्कूलच्या कला दालनातही अल्पेश घारेच्या विविध कलाकृती मांडण्यात आल्या आहेत, ज्या आज कला विषय शिकणाऱ्या आणि या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नवीन पिढीच्या मुलांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहेत. आपल्या अनोख्या कलेच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती सातासमुद्रापार पोहचवणाऱ्या अल्पेश घारेच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, या युवा कलाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.