कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा महोत्सवात सिंधुदुर्ग पोलिसांचा डंका....८ पदकांची कमाई.....विविध स्पर्धांमध्ये मिळवले दैदीप्यमान यश

कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा महोत्सवात सिंधुदुर्ग पोलिसांचा डंका....८ पदकांची कमाई.....विविध स्पर्धांमध्ये मिळवले दैदीप्यमान यश

ओरोस

 

      रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे पार पडलेल्या २१ व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा महोत्सव-२०२६ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत एकूण ८ पदकांवर आपले नाव कोरले आहे. १३ ते १५ जुलै दरम्यान पार पडलेल्या या क्रीडा महोत्सवामध्ये विविध वैयक्तिक आणि सांघिक कौशल्यांच्या स्पर्धांमध्ये जिल्ह्याच्या पोलिसांनी ३ सुवर्ण, ४ रौप्य आणि १ कांस्यपदक पटकावून सिंधुदुर्ग पोलीस दलाची मान उंचावली.या स्पर्धेत पोलीस उपनिरीक्षक अविनाश चंद्रकांत पाटील यांनी लिफ्टिंग अँड पॅकिंग, स्वयंचलित पोलीस साहित्य पी.एस.आय. सर्वांग कौशल्य स्पर्धा आणि पोलीस फोटोग्राफी या तिन्ही स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत ३ सुवर्णपदके पटकावली. तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमित आकाराम राणे यांनी अँटी साबोटेज चेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले.सहायक पोलीस निरीक्षक हर्षद सुनील हिले यांनी क्रिमिनल लॉ आणि कोर्ट जजमेंट तसेच लिफ्टिंग अँड पॅकिंग या स्पर्धांमध्ये दोन रौप्यपदके मिळविली. पोलीस हवालदार राहुल शिवाजी कोळे यांनी अँटी साबोटेज चेक स्पर्धेत, तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार निलेश निवृत्ती खोत यांनी बॉम्ब सर्च अँड ट्रॅकिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. याशिवाय पोलीस कॉन्स्टेबल जावेद शफिउल्ला मुल्ला यांनी पोलीस पोर्ट्रेट स्पर्धेत कांस्यपदक मिळवून जिल्ह्याच्या यशात मोलाची भर घातली.ही उल्लेखनीय कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच संघप्रमुख पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली साध्य झाली. स्पर्धेनंतर पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या नावलौकिकात भर पडली आहे.