जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वेंगुर्ला नगरपरिषदेचा पुढाकार......'महा-स्वच्छता मोहीम' व 'ई-कचरा संकलन अभियान' ५ जून रोजी
वेंगुर्ले
दिनांक 5 जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने शहरात पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि शाश्वत विकासाचा संदेश रुजविण्यासाठी 'महा-स्वच्छता मोहीम' व 'विशेष ई-कचरा संकलन अभियान' राबविण्यात येणार आहे.वेंगुर्ला शहरातील निसर्ग सौंदर्याने नटलेला व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा 'झुलता पूल ते नवाबाग बीच' हा परिसर स्वच्छ करण्यासाठी 5 जून 2026 रोजी सकाळी ठीक 7:00 वाजता नवाबाग बीच येथे झुलता पूलपासून भव्य 'महा-स्वच्छता मोहीम' राबविण्यात येणार आहे. या परिसरात पर्यटकांची मोठी वर्दळ असल्याने प्लास्टिक व इतर कचऱ्याचा साठा वाढून पर्यावरणीय समतोल धोक्यात येत आहे. सागरी पर्यावरण व जैवविविधतेवर होणारे विपरीत परिणाम रोखण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.या मोहिमेत विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, युवक मंडळे, विद्यार्थी तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन परिसर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.पर्यावरण व मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या ई-कचऱ्याच्या सुरक्षित व शास्त्रीय व्यवस्थापनासाठी विशेष 'ई-कचरा संकलन अभियान' देखील राबविण्यात येणार आहे. घरगुती वापरातील जुने अथवा नादुरुस्त मोबाईल, चार्जर, इयरफोन, संगणक, लॅपटॉप, कीबोर्ड, केबल्स, टीव्ही, रिमोट, मिक्सर, इस्त्री, घड्याळे, बल्ब, ट्युबलाईट तसेच इतर निकामी इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल वस्तूंचा समावेश ई-कचऱ्यामध्ये होतो.नागरिकांनी असा ई-कचरा सामान्य कचऱ्यात न टाकता 5 जून 2026 रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 1:00 या वेळेत शहरात फिरणाऱ्या विशेष संकलन वाहनाकडे सुपूर्द करावा किंवा नगरपरिषदेच्या इमारतीखाली कार्यरत 'आर.आर.आर. केंद्रा' त जमा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.वेंगुर्ला शहर स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक असून नागरिकांनी या दोन्ही मोहिमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पर्यावरण संरक्षणाच्या राष्ट्रीय अभियानात आपले मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने मा. नगराध्यक्ष व मा. मुख्याधिकारी यांनी केले आहे.
konkansamwad 
