मर्जीतल्या ठेकेदारांना कामे मिळवून देण्यासाठी आमदार निलेश राणेंचा अधिकाऱ्यांवर दबाव - वैभव नाईक

मर्जीतल्या ठेकेदारांना कामे मिळवून देण्यासाठी आमदार निलेश राणेंचा अधिकाऱ्यांवर दबाव - वैभव नाईक

कणकवली

 

         गेली २ वर्षे आमदार निलेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक कुडाळ मालवण मधील विकास कामांमध्ये हस्तक्षेप करून प्रत्येक काम आपल्या मर्जीतील ठेकेदारांना मिळवून देऊन त्यांच्याकडून टक्केवारी घेत आहेत. निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक पद्धतीने व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्न करत असताना निलेश राणे मात्र  स्पर्धात्मक पद्धतीने निविदा भरणाऱ्या  ठेकेदारांवर दबाव टाकून, त्यांना निविदा मागे घेण्यास भाग पाडत आहेत.एखाद्या ठेकेदाराने त्यांचे ऐकले नाही आणि स्पर्धात्मक पद्धतीने निविदा भरली तर अधिकाऱ्यांना पत्रे देऊन  ती निविदा रद्द करण्यासाठी निलेश राणे आणि त्यांचे  स्वीय सहाय्यक अधिकाऱ्यांवर देखील दबाव टाकत आहेत.असा आरोप  कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. त्याबाबतचा पुरावा म्हणून निलेश राणेंचे वायरल झालेले पत्र वैभव नाईक यांनी सादर केले असून आमदार निलेश राणे आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकाचा भ्रष्ट कारभार उघड केला आहे.मा.आ.वैभव नाईक म्हणाले, गेली २ वर्षे सार्वजनिक बांधकाम विभाग, समाजकल्याण विभाग, जिल्हापरिषद या विभागातील विकास कामे आपल्या मर्जीतल्या ठेकेदाराला मिळाली पाहिजेत आणि त्यांच्याकडून कमिशन मिळाले पाहिजे यासाठी निलेश राणे इतर ठेकेदारांवर आणि अधिकाऱ्यांवर  दबाव आणत आहेत.अशी अनेक कामे आहेत ज्यामध्ये ठेकेदारांनी स्पर्धात्मक पद्धतीने कमी टक्के दराने कामांची निविदा भरली होती. त्यात शासनाचाच फायदा होणार होता. परंतु ते  मर्जितले ठेकेदार नसल्याने अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्या ठेकेदारांच्या कागपत्रांमध्ये त्रुटी काढून त्यांच्या निविदा रद्द करण्यात आल्या. कमी टक्के दराच्या निविदा नाकारत शासकीय अधिकाऱ्यांनी शासनाचेच नुकसान करून  त्या कामांच्या फेरनिविदा काढल्या. प्रत्येक काम आपल्याच ठेकेदाराला मिळाले पाहिजे मग त्यात शासनाचे नुकसान झाले तरी चालेल अशी भूमिका निलेश राणेंची आहे. त्यामुळे मागील दोन वर्षात स्पर्धात्मक पद्धतीने न झालेल्या सर्व कामांची चौकशी राज्याचे मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री यांनी करावी अशी मागणी मा.आ. वैभव नाईक यांनी केली आहे.स्पर्धात्मक पद्धतीने विकास कामे व्हावीत यासाठी शासनाने विकास कामांची निविदा काढण्याची पद्धत अंमलात आणली. त्यामध्ये कमी टक्के दराने ज्या ठेकेदारांनी निविदा भरली त्यांच्या टक्केवारीच्या प्रमाणात त्यांच्याकडून डिपॉझिटची रक्कम भरून घेण्याची सक्ती शासनाने केली आहे. त्याचबरोबर कमी टक्के दराने निविदा भरली असली तरी अंदाजपत्रकाप्रमाणे दर्जेदार काम करून घेणे ही जबाबदारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आहे आणि अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम लोकप्रतिनिधींनी केले पाहिजे.जर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी  संगनमत करून निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करत असतील, ठेकेदारांवर दबाव आणत असतील तर कामांची निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक पद्धतीने होणार नाही.आणि असेच होणार असेल तर विकास कामांच्या निविदा काढू नका तुम्हाला वाटेल त्या ठेकेदाराला काम देऊन कमिशन घ्या असा टोला वैभव नाईक यांनी लगावला आहे.ते पुढे म्हणाले, निलेश राणेंनी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लिहिलेले पत्र मी मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे.निलेश राणे आणि त्यांचे स्विय सहाय्यक त्यांच्या मार्जितल्या ठेकेदारांना कामे मॅनेज करून देत आहेत आणि त्यातून ते कमिशन लाटत आहेत.आधी घेतलेली कामे अर्धवट टाकणाऱ्या ठेकेदारांना देखील पुन्हा नवीन कामे मॅनेज करून देण्यात आली आहेत. त्यामुळे निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. याची सखोल चौकशी करून जे कोण जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी  मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.