पतसंस्थांचा विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना चांगले प्रशिक्षण द्या - मनीष दळवी

पतसंस्थांचा विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना चांगले प्रशिक्षण द्या - मनीष दळवी

 

 

आंबोली

 

    कोकणात ठेवीदार व कर्जदारांचा पतसंस्थांवर मोठा विश्वास आहे. हा विश्वास अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आणि संस्थांचा पाया मजबूत करण्यासाठी पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांना तसेच संचालकांना आधुनिक प्रशिक्षण देणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले. सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली येथे आयोजित 'जिल्हास्तरीय पतसंस्था अधिवेशन २०२६' च्या मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हे अधिवेशन सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. या अधिवेशनासाठी जिल्हा बँकेच्या वतीने मोठ्या भावाच्या भूमिकेतून १ लाख रुपयांची मदत जाहीर करतानाच, भविष्यातही विनामोबदला सहकार्य करण्याचे आश्वासन मनिष दळवी यांनी दिले. पी. एफ. डॉन्ट्स यांनी लावलेले सहकाराचे रोपटे फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तम प्रकारे वाढवले असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.यावेळी जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, आंबोली सरपंच सावित्री पालयेकर, महाराष्ट्र फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगणे, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुदर्शन भालेराव, जिल्हा निबंधक सोपान शिंदे, मायकल डिसोजा, शशिकांत गावडे, गुरुनाथ पेडणेकर, महेश कुंभार, बाबूराव कवीटकर, रमेश बोंद्रे, नंदकिशोर कोरगावकर, सुनील नाईक, समीर वंजारी, विष्णू पराडकर, सुभाष चौधरी, पांडुरंग काकतकर, बी. आर. यादव आणि राजन तेली आदी मान्यवर उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ म्हणाले जिल्ह्यात अशा प्रकारचे जिल्हास्तरीय अधिवेशन पहिल्यांदाच होत आहे. सहकार चळवळ जिवंत ठेवण्यासाठी संस्थांनी 'आदर्श उपविधी' स्वीकारणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात पतसंस्थांना येणाऱ्या कर्ज वसुलीच्या अडचणी आणि आगामी काळातील 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या आधुनिक विषयांवर या अधिवेशनात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे, यावेळी कोकण विभागाचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे म्हणाले बदल आणि उपविधी हाच सहकाराचा मुख्य पाया आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पतसंस्थांकडे ९५ हजार कोटींचा प्रचंड निधी असल्याचे त्यांनी सांगितले या वेळी सुदर्शन भालेराव, शांतीलाल शिंगणे आणि श्री. लांबर यांनीही आपले विचार मांडले.कार्यक्रमाची सुरुवात सहकाराचा ध्वज फडकवून आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. सहकार क्षेत्रावर आधारित एका सुंदर गीताचे सादरीकरण या वेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शरद सावंत यांनी केले, तर संचालक जॉय डान्ट्स यांनी उपस्थितांचे आभार मानले.