सिंधुदुर्गात योग चळवळीसाठी गावडे काका महाराजांचे योगदान मोलाचे - केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

सिंधुदुर्गात योग चळवळीसाठी गावडे काका महाराजांचे योगदान मोलाचे - केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

 


 कुडाळ


      सिंधुदुर्ग जिल्ह्यात योग चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी सद्गुरू गावडे काका महाराज यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. योग ही परमेश्वररूपी सेवा असून समाजाचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी प्रत्येकाने योगाचा प्रचार करावा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.माड्याचीवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री सद्गुरू भक्त सेवा न्यासाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'डिप्लोमा इन योगशिक्षक' आणि 'एम.ए. इन योगा' अभ्यासक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हा कार्यक्रम पार पडला.यावेळी बोलताना नाईक म्हणाले, माड्याचीवाडीसारख्या ग्रामीण भागात धार्मिक कार्यासोबतच योग चळवळ उत्तम प्रकारे चालवली जात आहे. निरोगी समाज आणि सुदृढ पिढी घडविण्याचे प्रभावी माध्यम म्हणून योगाकडे पाहिले पाहिजे.यावेळी सद्गुरू गावडे काका महाराज यांनी संस्थेच्या भावी योजनांची माहिती दिली. येत्या काही महिन्यांत माड्याचीवाडी येथे भव्य योग भवन उभारण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 'एक गाव, किमान दोन प्रशिक्षित योगशिक्षक' हा संकल्प न्यासाने हाती घेतला आहे.गेल्या तीन वर्षांत १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी योगशिक्षकाचा डिप्लोमा पूर्ण केला असून, यावर्षीपासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून 'एम.ए. इन योगा' अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.या सोहळ्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते योगशिक्षक व प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाला योगशिक्षक आनंद सावंत, जि.प. सदस्या आरती पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, अतुल बंगे, मंगेश प्रभू, राकेश केसरकर यांच्यासह न्यासाचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी केले.