जिल्ह्यात आगामी सण-उत्सव शांततेत साजरे करा....प्रशासनाचे नागरिकांना आवाहन...

जिल्ह्यात आगामी सण-उत्सव शांततेत साजरे करा....प्रशासनाचे नागरिकांना आवाहन...

 

सिंधुदुर्गनगरी

 

   आगामी सण आणि उत्सव जिल्ह्यात सामाजिक सलोखा आणि शांततेच्या वातावरणात पार पडावेत, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या की, "सिंधुदुर्ग जिल्ह्याला सामाजिक ऐक्याची आणि सलोख्याची मोठी परंपरा आहे. ही परंपरा कायम राखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे." सण-उत्सवांच्या काळात नागरिकांनी संयम बाळगून जबाबदारीने वागावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी सोशल मीडियाच्या वापराबाबत नागरिकांना सतर्क केले. "सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जर कोणताही संशयास्पद प्रकार किंवा हालचाल आढळल्यास, तातडीने पोलीस विभागाशी संपर्क साधा," अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. अफवा पसरवणाऱ्यांवर प्रशासनाचे बारीक लक्ष असल्याचेही त्यांनी नमूद केले.या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासह शांतता समितीचे सर्व सदस्य आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.