अदृश्य शक्तीचे नाव घेण्याची राणेंमध्ये हिंमत नाही - परशुराम उपरकर

अदृश्य शक्तीचे नाव घेण्याची राणेंमध्ये हिंमत नाही - परशुराम उपरकर

 

कणकवली

 

        जिल्हा परिषद निवडणूकीतील अदृश्य शक्तीबाबत पालकमंत्री हे सातत्याने उल्लेख करत आहेत. परंतु त्या अदृश्य शक्तीचे नाव घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही, अशी टीका माजी आमदार परशूराम उपरकर यांनी केली.येथील आपल्या संपर्क कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल लागले. यात अनेक अपक्ष उमेदवार भाजप उमेदवारांना पराभूत करून निवडून आले आहेत. अदृश्य शक्तींमुळे हे उमेदवार निवडून आले, असा आरोप नुकताच पालकमंत्री यांनी केला होता. परंतु त्या अदृश्य शक्तीचे नाव माहिती असुनही त्यांनी ते नाव घेण्याची हिंमत दाखवली नाही.
       उपरकर म्हणाले, दीड वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या. यात मतदारामागे हजार रूपये वाटण्यात आले होते. त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही मतदारांना तीन हजार रूपये वाटण्यात आले. ही रक्कम वाटणारीच अदृश्य शक्ती आहे का? असा प्रश्न सिंधुदुर्गवासीयांना पडला आहे.नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद गटातील फोंडाघाट आणि नेरूरमध्ये अपक्ष उमेदवार निवडून आले. या अपक्षांना निवडून आणण्यासाठीही अदृश्य शक्ती होती. पालकमंत्र्यांना याच अदृश्य शक्तीबाबत बोलायचे आहे का ते त्यांनी स्पष्ट करावे. जिल्हा परिषद निवडणूकीत जे अपक्ष निवडून अाले ते आपल्या विजयामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे नाव घेतात. तर पालकमंत्री यांनी जिल्हा परिषद या निवडणुकीतील अदृश्य शक्तीचे नाव घेण्यास का घाबरतात? असेही उपरकर म्हणाले.