करूळ घाटात कारला भीषण अपघात

करूळ घाटात कारला भीषण अपघात

 

वैभववाडी


 

        वैभववाडी येथील करूळ घाटात महिंद्रा एक्सयुव्ही कारला भीषण अपघात झाला. पायरी घाटाजवळील एका धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ही कार खोल दरीत कोसळली. सुदैवाने, कार दरीत कोसळत असतानाच त्यातील दोघांनी प्रसंगावधान राखून बाहेर उड्या मारल्या, ज्यामुळे त्यांचे प्राण थोडक्यात वाचले.
        या घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस मध्यरात्री  घटनास्थळी दाखल झाले. त्यांना घाटातील वळणावर दोन व्यक्ती जखमी अवस्थेत बसलेले आढळले. प्राथमिक चौकशीत त्यांनी आपली कार दरीत गेल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने या दोघांना उपचारासाठी गगनबावडा येथे हलवले. सुदैवाने त्यांना केवळ किरकोळ दुखापत झाली होती. करूळ येथील 'सह्याद्री जीवरक्षक' टीमने पोलिसांच्या मदतीने बचाव मोहीम राबवली. जीवरक्षक दलाचे सदस्य दोरीच्या साहाय्याने खोल दरीत उतरले. तेथे कारचा पूर्णतः चक्काचूर झाला होता. टीमने गाडीतील महत्त्वाची कागदपत्रे शोधून पोलिसांच्या स्वाधीन केली. या मोहिमेत सह्याद्री जीवरक्षक टीमचे अध्यक्ष हेमंत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी शैलेश कांबळे यांनी परिश्रम घेतले.