चिपळूण वन विभागाची मोठी कामगिरी....४० फूट खोल विहिरीत अडकलेल्या दुर्मिळ 'ब्लॅक पँथर'ची सुटका!
चिपळूण
चिपळूण तालुक्यातील उमरोली (भडवळकरवाडी) येथे एक अत्यंत थरारक आणि यशस्वी वन्यजीव बचावमोहीम पार पडली आहे. येथील एका ४० फूट खोल आणि विना-कठड्याच्या विहिरीत पडलेल्या अंदाजे एक वर्ष वयाची मादी काळा बिबट्या (Black Panther) या दुर्मिळ वन्यप्राण्याला चिपळूण वन विभागाच्या पथकाने अथक परिश्रमांनंतर सुखरूप बाहेर काढले आहे. ग्रामपंचायत सदस्य योगेश खांडेकर यांनी वनरक्षक राहुल गुंठे यांना विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकाऱ्यांचे विशेष बचाव पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. लोकवस्तीपासून दूर शेतात असलेल्या या विहिरीत पाणी होते आणि बिबट्या विहिरीतील एका दगडाचा आडोसा घेऊन बसला होता. विहिरीची खोली आणि अरुंद जागेमुळे हे बचावकार्य अतिशय आव्हानात्मक होते. परंतु, वन पथकाने स्थानिकांच्या मदतीने अत्यंत संयमी आणि नियोजनबद्ध पवित्रा घेत सावधगिरीने पिंजरा विहिरीत सोडला. पिंजऱ्यात पाऊल ठेवताच बिबट्या त्यात जेरबंद झाला. सुखरूप बाहेर काढल्यानंतर या मादी बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कसून वैद्यकीय तपासणी करण्यात आली; ती पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाल्यावर वरिष्ठांच्या आदेशानुसार तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले. ही धडाडीची मोहीम कोल्हापूरच्या मुख्य वनसंरक्षक श्रीमती श्रीलक्ष्मी, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कामगिरीत स्थानिक ग्रामस्थांचेही मोठे सहकार्य लाभले. दरम्यान, अशाप्रकारचे वन्यप्राणी अडकल्यास नागरिकांनी स्वतः न ताणता तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वन विभातर्फे करण्यात आले आहे.
konkansamwad 
