प्रवाशांचा विश्वास पुन्हा एकदा 'लालपरी'वरच!....दिवाळी हंगामात एसटीने मोडले कमाईचे सर्व विक्रम
दिवाळीच्या सणात गावी जाणाऱ्या प्रवाशांनी खासगी वाहतुकीऐवजी एसटीच्या सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासाला पसंती दिल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची 'लालपरी' यंदा चांगलीच मालामाल झाली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या १६ दिवसांत महामंडळाने तब्बल ५४८ कोटी २२ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले असून, या काळात दररोज सरासरी ३४ कोटी २५ लाख रुपयांची कमाई झाली आहे. विशेष म्हणजे, परतीच्या प्रवासादरम्यान १६ नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात ४६ कोटी ५३ लाख रुपयांचा गल्ला जमवत एसटीने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. ऑक्टोबर महिन्यात दुष्काळी परिस्थिती आणि नियमांच्या सक्तीमुळे उत्पन्नात काहीशी घट झाली होती; मात्र यंदा गर्दीच्या हंगामातील नेहमीची हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा घेतलेला निर्णय प्रवाशांसाठी अत्यंत फायदेशीर ठरला. जुन्याच दरात प्रवास उपलब्ध झाल्याने आणि नियमांमध्ये शिथिलता मिळाल्याने प्रवाशांचा मोठा ओघ एसटीकडे वळला. या नेत्रदीपक कामगिरीबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी राज्यातील प्रवाशांचे आभार मानले असून, सणासुदीच्या काळात अहोरात्र सेवा देणारे अधिकारी, चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. प्रवाशांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे राज्याच्या सार्वजनिक वाहतुकीत 'लालपरी'चे स्थान आजही अढळ असल्याचे या आकडेवारीवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
konkansamwad 
