जुन्या शिवसैनिकांचा स्नेहमेळावा, संघर्षाच्या आठवणींना उजाळा

जुन्या शिवसैनिकांचा स्नेहमेळावा, संघर्षाच्या आठवणींना उजाळा

कणकवली

 

      १९८३ मध्ये भगवा सप्ताहाच्या निमित्ताने सुरू झालेला शिवसेनेचा प्रवास पुढे १९९० पर्यंत अधिक व्यापक झाला. मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रतिकूल परिस्थितीत संघटनेचे काम करणाऱ्या जुन्या शिवसैनिकांचा स्नेहमेळावा कणकवलीतील हॉटेल सावली, हुंबरठ येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्यात माजी आमदार परशुराम उपरकर आणि राजन तेली यांनी जुन्या शिवसैनिकांच्या योगदानाचा गौरव करत संघर्षमय आठवणींना उजाळा दिला.यावेळी बोलताना परशुराम उपरकर म्हणाले, १९८३ पासून कणकवली तालुक्यातील शिवसैनिकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिवसेनेचे काम केले. अनेकदा उपाशीपोटी राहून, एकमेकांना सहकार्य करत कोणत्याही पदाची किंवा लाभाची अपेक्षा न ठेवता संघटना वाढविण्यासाठी त्यांनी योगदान दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा '८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण' हा विचार डोळ्यासमोर ठेवून त्या काळातील शिवसैनिकांनी काम केले. खारेपाटणला ठेच लागली तर ओसरगावला त्याची जाणीव होईल, अशी एकजुटीची भावना त्यांच्यात होती. याच निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर शिवसेनेचा विस्तार झाला आणि आम्हाला राजकारणात पुढे जाण्याची संधी मिळाली. आज आमदारपदापर्यंत पोहोचण्यामागे या जुन्या सहकाऱ्यांचे मोठे योगदान आहे, असे त्यांनी नमूद केले.आज अनेक जुने शिवसैनिक वेगवेगळ्या राजकीय पक्षांत कार्यरत असले, तरी शिवसैनिक म्हणून असलेले जुने नाते कायम आहे. त्या काळात कोणताही राजकीय वारसा नसताना सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर गावागावांत ओळख निर्माण केली. अशा सहकाऱ्यांचे आभार मानण्यासाठी आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे. यापुढेही असेच एकत्र येत सामाजिक कार्याच्या माध्यमातून काम करूया. जुन्या सहकाऱ्यांची कामे सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन उपरकर यांनी दिले. यावेळी त्यांनी आपल्यासोबत काम केलेल्या आणि आज हयात नसलेल्या जुन्या शिवसैनिकांचे स्मरण केले. खारेपाटणपासून नरडवेपर्यंतच्या अनेक सहकाऱ्यांची नावे घेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.माजी आमदार राजन तेली यांनीही जुन्या शिवसैनिकांच्या संघर्षाचे कौतुक केले. १९८३ ते १९९० या काळातील शिवसैनिक आज एकत्र आल्याने जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्या काळात शिवसेनेचे नाव घेणेही अनेकदा धाडसाचे होते. घरातून आणि समाजातून विरोध असतानाही शिवसैनिकांनी संघर्षातून संघटना उभी केली. त्यांच्या आंदोलनांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात शिवसेनेचा विस्तार झाला, असे ते म्हणाले.१९८६ मधील नांदगाव येथील घटना आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर भगवा झेंडा कापण्यात आल्याच्या घटनेनंतर झालेल्या आंदोलनांचा उल्लेख करत त्यांनी त्या काळातील संघर्षाची आठवण करून दिली. वामनराव महाडिक आणि नारायण राणे यांच्यापासून जिल्ह्यातील शिवसेनेच्या वाटचालीला दिशा मिळाली. मात्र, गावागावांत संघटना रुजविण्यासाठी शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि सामान्य शिवसैनिकांनी घेतलेले कष्टही तितकेच महत्त्वाचे होते.नंदू आरोलकर, परशुराम उपरकर, आपण स्वतः आणि पावस्कर यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी त्या काळात संघटनेसाठी काम केले. कोणताही राजकीय वारसा नसताना सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर संघटना वाढवली. त्यांच्या सहकार्यामुळेच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आमदार होण्याची आणि विविध पदे भूषविण्याची संधी मिळाली. त्यामुळे या सर्व जुन्या शिवसैनिकांचे ऋण मान्य करणे आवश्यक आहे, असे तेली यांनी सांगितले.आज अनेक जुने शिवसैनिक वयाची साठी ओलांडून पुढे गेले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि वेळोवेळी अशा स्नेहमेळाव्यांचे आयोजन करणे गरजेचे आहे. जुन्या सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.अनेक वर्षांनंतर जुने सहकारी एकत्र आल्याने मेळाव्यात उत्साहासोबतच भावनिक वातावरण निर्माण झाले होते. राजकीय वाटा वेगळ्या झाल्या असल्या, तरी जुन्या मैत्रीचे आणि संघर्षातून निर्माण झालेल्या नात्याचे बंध आजही कायम असल्याचे या मेळाव्यातून दिसून आले. यावेळी अनिल हळदिवे, विठ्ठल देसाई, गुरु पावस्कर, सतीश कदम, नंदू आरोलकर, संजय मालंडकर, राजू राणे यांच्यासह कणकवली तालुक्यातील मोठ्या संख्येने जुने शिवसैनिक उपस्थित होते.