कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी!... यंदाचा दशावतार नाट्य महोत्सव देवगडमध्ये.... पारंपरिक मंडळांना मिळणार ५० टक्के सहभाग

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी!... यंदाचा दशावतार नाट्य महोत्सव देवगडमध्ये.... पारंपरिक मंडळांना मिळणार ५० टक्के सहभाग


सिंधुदुर्ग 


      कोकणच्या समृद्ध लोकपरंपरेचा मानबिंदू असलेल्या दशावतार कलेसाठी एक अत्यंत उत्साहवर्धक निर्णय घेण्यात आला असून, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित केला जाणारा यंदाचा 'दशावतार नाट्य महोत्सव' सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटननगरी देवगड येथे पार पडणार आहे. विशेष म्हणजे, या महोत्सवाच्या आयोजनात मूळ पारंपरिक दशावतार मंडळांना ५० टक्के सहभाग आणि वाटा देण्याच्या मागणीलाही संचालनालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. 'मूळ नऊ पारंपरिक दशावतार मंडळ शिखर संघा'च्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुंबईत सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर आणि उपसंचालक संदीप बलखंडे यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. दशावतार कलेचे जतन आणि संवर्धन व्हावे, या हेतूने यंदाचा महोत्सव देवगडमध्ये घेण्याची आणि त्यात पारंपरिक मंडळांना निम्मा वाटा देण्याची आग्रही मागणी पदाधिकाऱ्यांनी मांडली होती, जी अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ मान्य केली. या बैठकीत शिखर संघाचे अध्यक्ष सुधाकर दळवी, सचिव सौरभ पाटकर आणि कार्यकारिणी सदस्य बाबा मेस्त्री यांनी दशावतार मालक व कलाकारांच्या आर्थिक अडचणी, त्यांचे हक्क आणि या धार्मिक-सांस्कृतिक वारशाचे मूळ स्वरूप टिकवून ठेवण्यासाठी शासनाकडून अधिक व्यापक सहकार्य मिळावे, यावरही सविस्तर चर्चा केली. शासनाच्या या निर्णयामुळे कोकणातील पारंपरिक कलाकारांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पसरले असून, देवगडच्या या महोत्सवामुळे दशावतार कलेला मोठे व्यासपीठ मिळून हा अमूल्य वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होणार आहे.