कणकवली तालुक्यात बाहेरून येणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करा; मनसे आक्रमक
कणकवली
बाहेरून येणारे फेरीवाले मोठ्या प्रमाणात गावागावातून फिरत आहेत.सदर फेरीवाल्यांमुळे समस्या निर्माण होत आहेत त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांवर अन्यायकारक परिणाम होत आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून रस्त्यावर गर्दी वाढत आहे. कोणतीही नोंद/परवानगी नसताना व्यवसाय चालवला जात आहे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी संशयास्पद हालचाली देखील आढळून येतात तसेच कणकवलीत सध्या चोरीच्या घटना वाढत आहेत. वाहनांवर नंबर प्लेट नाहीत, वाहनांची कागदपत्रे नाहीत, वाहन परवाना नाहीत अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन होत आहे. स्थानिक नागरिकांवर नियमांची कडक अंमलबजावणी होत असताना बाहेरून येणाऱ्या फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. सर्वांवर समान नियम लागू करून निष्पक्ष कारवाई, संबंधित फेरीवाल्यांची सखोल चौकशी, परवानगी नसलेल्या फेरीवाल्यांवर तात्काळ कारवाई, नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई आणि संपूर्ण तालुक्यात विशेष मोहीम राबवून यावर नियंत्रण ठेवण्यात यावे अशी मागणी मनसेकडून कणकवली पोलीस स्टेशनकडे करण्यात आली. यावेळी मनसे जिल्हा उपसचिव अनंत आचरेकर, तालुका अध्यक्ष शांताराम सादये, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे व विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष समिर तेली, उपतालुका अध्यक्ष अम्रुते, माजी तालुकाध्यक्ष बिडवाडकर, देवेंद्र जाधव, सुनील सोनार आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
konkansamwad 
