बूथपासून घरापर्यंत पोहोचणार भाजपाचा ध्वज; सावंतवाडीत प्रदेशाध्यक्षांच्या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी
भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 'भाजपा ध्वज वाटप अभियान' मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विशेष अभियानाचा शुभारंभ भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते सावंतवाडी येथील भाजपा संपर्क कार्यालयात करण्यात आला. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन हा कार्यकर्त्यांपासून सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वांसाठी अभिमानाचा सोहळा आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या घरावर, तसेच मंडल, बूथ आणि शक्ती केंद्र कार्यालयांवर हजारोंच्या संख्येने भाजपाचे ध्वज फडकवले जाणार आहेत. स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित या कार्यक्रमात विशाल परब यांनी कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष ध्वज वाटप करून या अभियानाला गती दिली. ध्वज वाटप सोहळ्याला भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदारसंघातील हजारो घरांवर भाजपाचे ध्वज दिमाखाने फडकतील, अशी भावना विशाल परब यांनी यावेळी व्यक्त केली.या अभियानामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून, घराघरांत पक्षाचा विचार आणि ध्वज पोहोचवण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
konkansamwad 
