काही झाले तरी आम्ही दिपक केसरकरांसोबत; जिल्हाप्रमुख संजू परब

काही झाले तरी आम्ही दिपक केसरकरांसोबत; जिल्हाप्रमुख संजू परब

सावंतवाडी

 

     काही वर्षांपुर्वी दीपक केसरकरांनी दिलेल्या भाकरीवर आपला उदरनिर्वाह करीत होते तेच लोक आता काही लोकांकडुन पैसे घेवून त्यांच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. मात्र काही झाले तरी केसरकर यांच्या पाठिशी येथील जनता ठामपणे उभी आहे, असा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. दरम्यान आमदार केसरकर हे देवभक्त आहेत. त्यामुळे त्यांना कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही कार्यकर्ते म्हणून त्यांच्या सोबत राहणार आहोत, असा विश्वास परब यांनी व्यक्त केला. ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून केसरकर यांच्या विरोधात काही दिवसापुर्वी आंदोलन करण्यात आले होते. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर परब यांनी पत्रकार परिषद घेवून प्रत्युत्तर दिले. यावेळी महिला जिल्हाप्रमुख निता कविटकर, जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, क्लेटस फर्नांडिस, गुंडू जाधव, राकेश पवार, संजय गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी परब म्हणाले, केसरकर हे देवभोळे आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे, असे असताना ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून जाणीवपुर्वक त्यांना बदनाम केले जात आहे. त्यासाठी काही लोकांनी पाचशे रुपये देवून माणसे आणली होती. ही वस्तूस्थिती आहे, असा आरोप परब यांनी केला. कोणा सोबत फोटो आहे? कोण कुठच्या मंदिरात गेले म्हणून कोणाला आरोपी करणे चुकीचे आहे. त्यामुळे केसरकर यांच्या विरोधात बोलणाऱ्या नेत्यांचा आम्ही निषेध करतो. केसरकर यांच्या समवेत अनेक लोक त्या ठिकाणी दर्शनासाठी गेले होते. ते त्यांनी आधीच सांगितले आहे, अशा परिस्थितीत त्यांना बदनाम करणे चुकीचे आहे आणि त्यांना कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही त्यांच्या सोबतच राहणार आहोत, असा इशारा परब यांनी दिला. यावेळी कविटकर यांनी नाराजी व्यक्त केली. देवभोळ्या मासणाला अशा प्रकारे राजकीय फायद्यासाठी बदनाम करणे चुकीचे आहे. हे प्रयत्न आम्ही यशस्वी होवू देणार नाही. काही झाले तरी आम्ही केसरकर यांच्यासोबत राहणार आहोत.