युद्धात ट्रम्पना मोठा झटका: मदतीच्या आवाहनानंतर तीन जवळच्या मित्रदेशांनी फिरवली पाठ!
वॉशिंग्टन/तेहरान
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेशले असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा राजनैतिक धक्का बसला आहे. जगातील २० टक्के तेल वाहतुकीचा केंद्रबिंदू असलेल्या होर्मुझ स्ट्रेटच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने केलेल्या मदतीच्या आवाहनाला त्यांच्याच मित्रदेशांनी प्रतिसाद देण्यास नकार दिला आहे. परिणामी, इराणविरुद्धच्या या संघर्षात अमेरिका सध्या एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. युद्ध सुरू झाल्यापासून इराणने मोक्याची 'होर्मुझची सामुद्रधुनी' बंद केली आहे. यामुळे जागतिक तेल आणि गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, भारताच्या विनंतीनंतर इराणने केवळ भारतीय तेलवाहू जहाजांना तिथून जाण्याची मुभा दिली आहे, परंतु अमेरिकेची कोंडी मात्र कायम आहे. ही कोंडी फोडण्यासाठी ट्रम्प यांनी मित्रदेशांना आपापल्या युद्धनौका तिथे पाठवण्याची विनंती केली होती. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सात देशांशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले होते, मात्र प्रमुख मित्रदेशांनी एकामागून एक हात झटकले आहेत. जपानने स्पष्ट केले आहे की, ते सध्या अशा कोणत्याही लष्करी ऑपरेशनचा विचार करत नाहीत. "अजूनपर्यंत आम्हाला अधिकृत विनंती मिळालेली नाही," असे सांगत जपानच्या पंतप्रधानांनी या विषयातून अंग काढून घेतले आहे. एएफपीच्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियाने ट्रम्प यांच्या विनंतीनंतरही होर्मुझ स्ट्रेटमध्ये आपल्या युद्धनौका पाठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. नाटोचा सदस्य असूनही तुर्कीने या युद्धापासून स्वत:ला आधीच लांब ठेवले आहे. फ्रान्सच्या संरक्षण मंत्री कॅथरीन वॉट्रिन यांनीही कठोर भूमिका घेत सांगितले की, जोपर्यंत युद्ध वाढत राहील, तोपर्यंत फ्रान्स आपल्या युद्धनौका तिथे पाठवणार नाही. एकीकडे अमेरिका आपल्या मित्रांना एकत्र आणण्यासाठी धडपडत असताना, दुसरीकडे इराणचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. तिसऱ्या आठवड्यातही अमेरिका-इस्रायलला अपेक्षित यश मिळालेले नाही. दक्षिण कोरिया अजूनही या विषयावर विचार करत असला, तरी प्रमुख युरोपीय आणि आशियाई देशांच्या नकाराने ट्रम्प प्रशासनासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
konkansamwad 
