इराणचा मोठा निर्णय! जगासाठी मार्ग बंद, पण भारताची जहाजे सुखरूप
नवी दिल्ली
इराण-इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक इंधन पुरवठ्याचे केंद्र असलेला 'होर्मूज स्ट्रेट' सध्या बंद करण्यात आला आहे. यामुळे जगात इंधन टंचाईचे सावट असतानाच, भारतासाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराणने विशेष सवलत देत भारताच्या दोन जहाजांना या मार्गावरून जाण्याची परवानगी दिली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे इराणने होर्मूजची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी रोखली आहे. जगाच्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजेपैकी २५% आणि भारताच्या गरजेच्या तब्बल ४०% तेलाची वाहतूक याच मार्गाने होते. हा मार्ग बंद झाल्याने अनेक देशांची जहाजे अडकून पडली आहेत आणि कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारताची दोन जहाजे सुरक्षित बाहेर पडल्याने भारताच्या परराष्ट्र धोरणाचे मोठे यश मानले जात आहे. या घडामोडीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले की, भारताची इराणसोबत थेट चर्चा सुरू आहे आणि त्याचाच सकारात्मक परिणाम म्हणून भारतीय झेंडा असलेली दोन जहाजे सुरक्षितपणे या मार्गातून बाहेर पडली. महत्त्वाची बाब म्हणजे, यासाठी भारत आणि इराणमध्ये कोणताही गुपित करार झालेला नाही. या परवानगीच्या बदल्यात भारताने इराणला काहीही दिलेले नाही. ही केवळ सतत सुरू असलेल्या संवादाची फलश्रुती आहे.
konkansamwad 
