फोंडाघाट महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
फोंडाघाट
फोंडाघाट येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात "वाचन प्रेरणा दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमावेळी प्रा. विनोदसिंह पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात वाचनाचे महत्त्व अधोरेखित करताना विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले.
प्रा. पाटील म्हणाले, "वाचनामुळे विचार परिपक्व होतात आणि व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा अतिवापर वाढला असून त्यामुळे वाचन संस्कृतीकडे दुर्लक्ष होत आहे. वाचनाने मनात प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नांची उत्तरेही सखोल चिंतनातून मिळतात. परंतु सोशल मीडियावरील माहिती ही वरवरची असते, त्यामुळे सखोल ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तकांशी मैत्री करणे गरजेचे आहे." त्यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांनी नियमितपणे ग्रंथालयाचा वापर करून वाचनाची सवय लावली पाहिजे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पुरंधर नारे म्हणाले, "वाचल तर वाचल!" — या एका वाक्यात वाचनाचे संपूर्ण सार दडलेले आहे. ग्रंथालयातील विविध वाचनसाहित्याचा विद्यार्थी वर्गाने वेळोवेळी उपयोग करून आपली बौद्धिक वाढ साधावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विद्या मोदी यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. राजाराम पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारीवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

konkansamwad 
