वेंगुर्ला येथील सचिन पालव याला तबला, हार्मोनियम, गायन व पखवाजमध्ये 'विशारद' पदवी

वेंगुर्ला
वेंगुर्ला वडखोल येथील रहिवासी सचिन भालचंद्र पालव याने तबला, हार्मोनियम, गायन व पखवाज या चारही वाद्य कलांमध्ये "विशारद" पदवी मिळवली आहे. एप्रिल-मे मध्ये झालेल्या पखवाज विशारद पूर्ण परीक्षेत त्याने प्रथम श्रेणी मिळवून यश संपादन केले आहे. या यशाने सचिन आता तबला, हार्मोनियम, गायन आणि पखवाज या चारही संगीत क्षेत्रांमध्ये विशारद होणारा पहिला व्यक्ती ठरला आहे. या युवा संगीतकाराने आपल्या आयुष्यातील अनेक संकटांवर मात करत एक नवा इतिहास घडवला आहे.सचिनला पखवाज वादनाचे धडे निलेश पेडणेकर आणि मनीष तांबोसकर या गुरूंकडून मिळाले. संगीत क्षेत्रात यशाच्या पायऱ्या चढत असतानाच, सचिनला अचानक किडनीचा गंभीर त्रास सुरू झाला. उपचारासाठी येणारा मोठा खर्च कुटुंबाला परवडणारा नव्हता. अशा कठीण प्रसंगात समाजातील अनेक दानशूर नागरिकांनी त्याला आर्थिक मदत केली, ज्यामुळे त्याला उपचारातून सावरता आले. या सर्व संकटांवर मात करून सचिनने आपली जिद्द आणि मेहनतीच्या बळावर पखवाज विशारद ही पदवी मिळवली. सचिनच्या या असामान्य यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.