मानवी साखळी करून मोदी सरकारला दर्शवला कुडाळातून पाठिंबा.....दिल्लीतील घडामोडींवर भाजप आक्रमक 

मानवी साखळी करून मोदी सरकारला दर्शवला कुडाळातून पाठिंबा.....दिल्लीतील घडामोडींवर भाजप आक्रमक 

कुडाळ

 

       दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला समर्थन देण्यासाठी कुडाळ तालुका भारतीय जनता पक्षाने गुरुवारी जोरदार निदर्शने केली.भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कुडाळ भाजप कार्यालयासमोर एकत्र येत मानवी साखळी उभारली. कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर हातात फलक घेऊन कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.या प्रसंगी सावंत म्हणाले की नीट परीक्षा घोटाळा, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या किंवा विद्यार्थी-पालकांना झालेला त्रास या गोष्टींचे भाजप कधीही समर्थन करत नाही. विद्यार्थी सनदशीर मार्गाने आंदोलन करत असले, तरी त्यात काही समाजविघातक शक्ती घुसून आपला राजकीय फायदा उठवण्याचा आणि देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाच्या वाटेवर नेले असून, अशा वेळी कोणी त्यांच्या पात्रतेवर बोलून अवमान करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही,दिल्लीत विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीवर भाष्य करताना सावंत म्हणाले की, या प्रकाराबाबत पक्षाच्या भावना तीव्र आणि संवेदनशील आहेत. आंदोलनात घुसलेल्या समाजविघातक शक्तींमुळे हा मारहाणीचा प्रकार घडला असून, याची चौकशी होऊन दोषींवर नक्कीच कारवाई होईल. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मानवी साखळीत भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, पंचायत समिती उपसभापती सीताराम तेली यांच्यासह अनेक प्रमुख लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.