सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा....दोन महिन्यात कामाला होणार सुरुवात
सावंतवाडी
सावंतवाडी येथील राजघराण्याने हॉस्पिटलसाठी आवश्यक असलेल्या जागेला संमती दिल्याने अनेक वर्षे रेंगाळलेला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा झाला असून येत्या दोन महिन्यात या कामाला सुरुवात होईल, त्या ठिकाणी ८० कोटी खर्च करून सात मजली इमारत उभी करण्यात येईल, असा दावा आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केला.न्यायालयाचा निर्णय लागल्यानंतर झूम अॅपच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधताना केसरकर म्हणाले की, गेली अनेक वर्षे हा प्रश्न जागेअभावी रेंगाळला होता. त्यामुळे वर्षाकाठी सुमारे दहा हजार रुग्णांना गोवा-बांबोळी येथे जावे लागत होते, अनेक रुग्णांना वाटेतच प्राण गमवावा लागत होता. मात्र आता कळीचा मुद्दा दूर झाला असून राजघराण्यातील दोन्ही बाजूंकडून परवानगी मिळाली आहे.येत्या चार दिवसात राजघराण्यातील संबंधित व्यक्तींना ५० गुंठे जागा देण्यात येणार असून उर्वरित जागेत हे भव्य हॉस्पिटल उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला या रुग्णालयासाठी ३६ कोटींचा निधी मंजूर झाला होता, मात्र जागेचा अडथळा दूर न झाल्याने आता खर्च ८० कोटींवर गेला आहे.या सात मजली इमारतीत कॅन्सर, ब्रेन सर्जरी, हार्ट सर्जरी आणि यूरोलॉजी असे चार अत्याधुनिक विभाग असणार असून त्याचा थेट फायदा सर्वसामान्य रुग्णांना होणार आहे. या सहकार्याबद्दल त्यांनी सावंतवाडी राजघराणे, कोल्हापूर खंडपीठाचे अधिवक्ता, वकील आणि शासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले.
konkansamwad 
