हृदयद्रावक घटनाःआंबोलीत ट्रकच्या धडकेत चिमुकलीचा जागीच मृत्यू
आंबोली
फरशा वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहा वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली. निकिता प्रसाद राऊत (वय १०) असे तीचे नाव आहे. तर तिची आई चैताली गंभीर जखमी झाली. ही घटना आज ११ वाजण्याच्या सुमारास आंबोली घाटात यु आकाराच्या वळणाच्या परिसरात घडली. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न असलेल्या ट्रक आंबोली घाटात पलटी झाल्यामुळे तब्बल अडीच तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघातानंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून संबंधित चालकाला आमच्या ताब्यात द्या, अशी आक्रमक मागणी केली आहे. त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुचाकी चालक राऊत हे आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन आंबोलीहून सावंतवाडीच्या दिशेने निघाले होते. यावेळी नशेच्या अवस्थेत भरधाव वेगात असलेल्या फरशी वाहतूक करणाऱ्या ट्रकची त्यांच्या गाडीला घाटात धडक दिली. यात चिमुकली गाडीवरून खाली पडल्यामुळे जागीच ठार झाली तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर चालकाने सावंतवाडीच्या दिशेने पळ काढला. काही किलोमीटर गेल्या नंतर चालकाचा गाडीवर ताबा सुटल्यामुळे ट्रक यु आकाराच्या वळणाच्या परिसरात रस्त्याच्या मधोमध पलटी झाली तर फरशाही रस्त्यावर कोसळल्या. त्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. हा सर्व प्रकार घडल्यानंतर निकिताचा मृतदेह आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आंबोलीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली तसेच चालक व क्लीनरच्या विरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली. आमच्या चिमुकलीच्या मृत्यूला जबाबदार ठरणाऱ्या या दोघांना आमच्या ताब्यात द्या, असे सांगून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी पोलीस हवालदार रामदास जाधव व संतोष गलोले यांनी योग्यरीत्या परिस्थिती हाताळली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. यासाठी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा आणि नगरसेवक देवा टेमकर यांनी वाहतूक सुरळीत व जखमींना मदत करण्यासाठी सहकार्य केले. आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आत्माराम पालेकर, संतोष पालेकर व अन्य ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
konkansamwad 
