वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध....डॉक्टर संघटना आक्रमक
वैभववाडी
वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा वैभववाडी डॉक्टर्स फॅटर्निटी क्लब आणि जिल्हा डॉक्टर संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत आता गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याची संतप्त प्रतिक्रिया संघटनेने दिली आहे. रविवारी एका ९ वर्षीय बालकाला उपचारासाठी रुग्णालयात आणले होते, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्यावर नातेवाईकांनी संताप व्यक्त करत डॉ. मोरे यांना मारहाण केली. यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत साहित्याची तोडफोड केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच वैभववाडी तालुका डॉक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन डॉ. मोरे यांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. आपण अजिबात एकटे नसून संपूर्ण संघटना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. डॉक्टरांवर होणारे असे हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका घेत आरोग्यसेवा देणाऱ्यांच्या सन्मानासाठी एकजुटीने लढण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे. या प्रकरणी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, रुग्णालयातील तोडफोडीची नुकसानभरपाई संबंधितांकडून वसूल करावी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कडक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, असेही प्रशासनाला ठणकावून सांगण्यात आले आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे, तालुकाध्यक्ष डॉ. संजय मराठे, डॉ. वासुदेव हिर्लेकर, डॉ. प्रविण मेस्त्री, डॉ. उपेंद्र हिर्लेकर, डॉ. अमित गोखले, डॉ. युवराज निकम, डॉ. शिवाजी पाटील आणि डॉ. चंदन धावले यांच्यासह अनेक डॉक्टर उपस्थित होते.
konkansamwad 
