उत्तर भारतात थंडी-धुक्याचा कडाका, तर १० राज्यांत पावसाचा इशारा....महाराष्ट्रात हवामान कसे राहील?

उत्तर भारतात थंडी-धुक्याचा कडाका, तर १० राज्यांत पावसाचा इशारा....महाराष्ट्रात हवामान कसे राहील?

मुंबई
 

    नोव्हेंबर अखेरीस देशाच्या हवामानात मोठा बदल पाहायला मिळत असून उत्तर भारतात थंडी आणि धुक्याचा जोर वाढत असतानाच, दुसरीकडे चक्रीवादळाच्या प्रभावामुळे 10 राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये सकाळी दाट धुके जाणवत असून रविवारी दिल्लीत किमान तापमान 16 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर आज कमाल 26 आणि किमान 14 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे; नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरिदाबादमध्येही धुक्याची शक्यता आहे. मथुरा, आग्रा, बरेली, कानपूर, सहारनपूर आणि रामपूरसह उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून पूर्व उत्तर प्रदेशात आज आणि उद्या दाट धुक्याचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरसह कुल्लू, मनाली, चंबा व किन्नौरमध्ये बर्फवृष्टी सुरू झाल्याने मैदानी भागातही थंडी वाढण्याची शक्यता आहे, तर पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेशात हवामान कोरडे राहील. महाराष्ट्रात काही भागांत हवामान कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहणार असून डिसेंबरच्या सुरुवातीला थंडीची लाट येण्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा तसेच आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पावसाचा इशारा असून आसाम-मेघालयात काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि ईशान्येकडे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे; बिहारमधील सुपौल, अररिया, किशनगंज, पूर्णिया, कटिहार व भागलपूरमध्ये पावसाचा अंदाज असून भागलपूर आणि कटिहारमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर झारखंडच्या सात जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडू शकतो. याशिवाय दक्षिण भारतात 23 ते 27 नोव्हेंबरदरम्यान तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये मुसळधार पाऊस तर 24 ते 26 नोव्हेंबरदरम्यान केरळमध्ये पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे, तर उत्तरेकडील तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.