शाळा दत्तक घेऊन सावंतवाडी उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकरांचा आदर्श उपक्रम

शाळा दत्तक घेऊन सावंतवाडी उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकरांचा आदर्श उपक्रम

सावंतवाडी, ता. २०

 

       भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकी जपत एक कौतुकास्पद उपक्रम राबवला आहे.जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ४ मध्ये विविध शैक्षणिक व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत त्यांनी ही शाळा दत्तक घेण्याचा संकल्प केला आहे.या जिल्हा परिषद शाळेत वाढती पटसंख्या आणि उच्च श्रेणी मुख्याध्यापकांचे पद रिक्त असल्याने शिक्षकांवर प्रशासकीय कामांचा मोठा ताण येत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात कोणताही अडथळा येऊ नये आणि शिष्यवृत्ती तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये मुलांनी यश मिळवावे, यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावानुसार दोन स्वयंसेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे.या दोन्ही स्वयंसेविकांचे वर्षभराचे मानधन स्वतः देण्याचा दिलेला शब्द पाळत अॅड. निरवडेकर यांनी नवनियुक्त स्वयंसेविका श्रीमती चुनेकर यांना मानधनाचा धनादेश सुपूर्द केला. तसेच या शाळेत दुसऱ्या स्वयंसेविका म्हणून श्रीमती सावंत यांचीही नियुक्ती करण्यात आली असून त्यांचेही मानधन ते स्वतःच देणार आहेत.या उपक्रमांतर्गत शाळेच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेच्या छताची दुरुस्ती करण्यात आली असून पोषण आहार धान्यासाठी स्वतंत्र केबिन उभारण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी शाळेत वायफाय सुविधा सुरू करण्यात आली असून बंद पडलेली मोठी टीव्ही स्क्रीन दुरुस्त करण्यात आली आहे.याशिवाय शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तम यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला, तसेच संपूर्ण शाळेची स्वच्छता करून ही शाळा एक स्वच्छ, सुंदर आणि 'आदर्श शाळा' म्हणून विकसित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.अॅड. निरवडेकर यांच्या या सहकार्याबद्दल सर्व पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रेरणेने असे उपक्रम पुढेही सुरू ठेवणार असल्याचे अॅड. निरवडेकर यांनी यावेळी सांगितले.