सावंतवाडीतील खासकीलवाडा प्रभागातील विकासकामांना वेग.....आशिष सुभेदार यांच्या प्रयत्नांना यश
सावंतवाडी
खासकीलवाडा व न्यू खासकीलवाडा प्रभागातील रखडलेल्या विकासकामांबाबत शिवसेना उबाठा कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी आवाज उठविल्यानंतर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सुभेदार यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रभागातील विकासकामांना सुरुवात करण्यात आली आहे.खासकीलवाडा व न्यू खासकीलवाडा प्रभागात सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक यांच्यात गटबाजी असल्यामुळे अनेक कामे ठप्प झाली होती. ठेकेदार व प्रशासनाच्या चुकीमुळे अर्धवट स्थितीत तसेच निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने ऐन उन्हाळी हंगामात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोप सुभेदार यांनी केला होता.ठिकठिकाणी पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. नगरसेवकांमधील अंतर्गत गटबाजीचा फटका विकासकामांवर होत असल्याचे सुभेदार म्हणाले. अनेक कामांचे टेंडर व वर्क ऑर्डर होऊनही पालिकेतून कामे सुरू करू नये असे आदेश आल्याने ती रखडली होती.प्रशासनाला गांभीर्य नसल्याने चुकीच्या खोदाईमुळे पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले. पाणी टंचाई असताना अशी घटना घडणे नागरिकांच्या हिताचे नाही, असे सुभेदार यांनी म्हटले.कचऱ्याची दुर्गंधी, लाईनवरील झाडी तोडणे, स्ट्रीट लाईटची कामे, अर्धवट गटार बांधकाम ही प्रमुख कामे रखडली आहेत. चुकीच्या खोदाईमुळे पावसाळ्यात पाणी तुंबून घरात शिरण्याची भीती आहे.कामे पूर्ण न झाल्यास स्थानिक नागरिकांना घेऊन मुख्याधिकारी यांना घेराव घालण्याचा इशारा सुभेदार यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर पालिकेकडून जोमाने विकासकामांना सुरुवात झाली आहे. पुन्हा असा प्रकार घडल्यास नगरपरिषदेवर घागर मोर्चा काढू, असा इशारा ठाकरे गटाचे कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी दिला आहे.
konkansamwad 
