'इथे ओशाळला मृत्यू' नाट्यप्रयोगाने वेंगुर्ले भारावले
वेंगुर्ले
त्याग आणि असीम बलिदानाचा रोमांच अंगावर उभा करणारा ऐतिहासिक नाट्यप्रयोग "इथे ओशाळला मृत्यू" शनिवार, 2 मे 2026 रोजी वेंगुर्ले येथील मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात मोठ्या दिमाखात सादर झाला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य नवीन पिढीसमोर यावे, या उद्देशाने डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब सिंधुदुर्ग वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन यांनी या नाटकाचे आयोजन केले होते. या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते श्री. विशाल परब आणि सौ. वेदिका परब यांच्या हस्ते झाले. यावेळी वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप, डॉ. संजीव लिंगवत, डॉ. मिलिंद काळे, डॉ. राजेश्वर उबाळे, डॉ. सुरेखा काळे, ज्येष्ठ भाजपा नेते शरद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक सचिन शेट्ये, नगरसेविका गौरी माईनकर, नगरसेविका रिया केरकर आदी मान्यवर उपस्थित होते.उद्घाटनप्रसंगी बोलताना विशाल परब म्हणाले, "धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा त्याग आणि बलिदानाचा इतिहास हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पान आहे, ज्याला रक्तरंजित इतिहासाची दुर्दैवी झालर आहे. हा इतिहास विसरता येण्याजोगा नाही आणि विसरावा असा तर मुळीच नाही. हा इतिहास नव्या पिढीच्या रक्तात भिनला पाहिजे." रात्री 9 वाजता सुरू झालेल्या या अजरामर नाट्यप्रयोगाने शेकडो रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्याप्रति हळव्या भावविश्वाचा आणि कठोर बलिदानाचा ज्वलंत इतिहास मंचावर जिवंत होताना पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणि अंगावर रोमांच उभे राहिले.डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब व वेंगुर्ले मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून वेंगुर्ल्यात वृक्षारोपण, आरोग्य शिबिर यांसारखे विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून हा ऐतिहासिक नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती आयोजकांनी दिली.
konkansamwad 
