रेशन वाटपावर सिंधुदुर्गात महत्त्वाची बैठक; अडचणी सोडवण्याचे आश्वासन
सिंधुदुर्ग
कोकणातील दुर्गम व डोंगराळ भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांचे रेशन धान्य एकत्रितपणे वितरित करण्याच्या निर्णयामुळे लाभार्थी व रेशन दुकानदारांसमोर निर्माण झालेल्या अडचणींची गंभीर दखल घेत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील तारिणी सभागृहात जिल्हा व शहर रेशनिंग धान्य दुकानदार व रॉकेलधारक संघटनेच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत लाभार्थी आणि दुकानदारांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी पुरवठा विभागाने शासन स्तरावर तातडीने पाठपुरावा करून योग्य तो मार्ग काढावा, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. सार्वजनिक वितरण व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून लाभार्थी, रेशन दुकानदार आणि प्रशासन यांच्यात समन्वय राखत नागरिकांना अखंड व सुरळीत सेवा मिळावी, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. या बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा व शहर रेशनिंग धान्य दुकानदार व रॉकेलधारक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रूपेश पेडणेकर आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
konkansamwad 
