सातबारा नव्हे, आता ओळख!.....सांगेलीत २६४ महिलांना मिळाला 'शेतकरी' चा मान.....ग्राम महसूल अधिकारी सचिन चितारे यांचा कौतुकास्पद उपक्रम
सावंतवाडी
कोकणातील अनेक कुटुंबांमध्ये शेतीची जमीन पती किंवा सासऱ्यांच्या नावावर असल्याने महिलांना शासकीय योजना आणि कृषी सुविधांचा लाभ घेण्यात अडचणी येतात. ही अडचण दूर करण्यासाठी सांगेलीचे ग्राम महसूल अधिकारी तथा माजी सैनिक सचिन चितारे यांनी पुढाकार घेत 264 महिला शेतकऱ्यांना शेतकरी दाखले उपलब्ध करून दिले.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या दाखल्यांचे वितरण करण्यात आले. विशेष बाब म्हणजे, ज्या कुटुंबप्रमुखांनी आपल्या घरातील महिलांना दाखला मिळवून देण्यासाठी सहकार्य केले त्यांच्याच हस्ते संबंधित महिलांना दाखले देण्यात आले. त्यामुळे या उपक्रमाला भावनिक स्वरूप प्राप्त झाले.कार्यक्रमात बोलताना सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सचिन चितारे यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. प्रशासनातील कर्तव्यासोबत सामाजिक बांधिलकी जपत महिलांना शासकीय योजनांच्या प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केले असल्याचे पाटील म्हणाले. शेतकरी दाखला हा महिलांसाठी शासकीय सुविधा मिळविण्याचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. सांगेलीत राबविलेला हा उपक्रम महिलांच्या स्वावलंबनाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असून इतर गावांसाठीही आदर्श ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.या कार्यक्रमाला सरपंच लवू भिंगारे, उपसरपंच संतोष नार्वेकर, माजी जि.प. सदस्य पल्लवी राऊळ, मंडळ अधिकारी संजय यादव, माजी सैनिक कॅप्टन भास्कर कोचरेकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
konkansamwad 
