श्री क्षेत्र टेरवचा शिमगोत्सव जल्लोषात संपन्न
टेरव
निसर्गरम्य परिसरातील सुप्रसिद्ध व जागृत देवस्थान असलेल्या श्री क्षेत्र टेरव येथील श्री कुलस्वामिनी भवानी-वाघजाई देवीचा शिमगोत्सव यंदा अत्यंत धार्मिक वातावरणात, शिस्तबद्ध पद्धतीने आणि पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. कोकणच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या उत्सवात सर्व ग्रामस्थ आणि चाकरमानी मोठ्या संख्येने सहभागी झाले.उत्सवाची सुरुवात वाडीवाडीत होळी प्रज्वलित करून झाली. मुख्य मंदिरासमोर लाकडे, कवळ आणि गवताने सजविलेल्या 'होमा'ची पुजाऱ्यांनी गावच्या मानकऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा केली. 'भद्रेचा शिमगा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सोहळ्यात चांदीने मढविलेली पालखी सजवून त्यात कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई यांच्यासह भैरी, केदार, महालक्ष्मी आणि कुलस्वामिनी या देवतांच्या प्रतिमा विराजमान करण्यात आल्या. पहाटेच्या मंगल समयी ढोल-ताशांच्या गजरात होमाभोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. यावेळी 'भैरी-केदाराच्या चांगभलं' च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला पालखीचा 'छबिना' लिंगेश्वर वाडीतील स्वयंभू पुरातन शंकर मंदिरापासून निघाला. विविध वाड्यांमधून जाताना ग्रामस्थांनी आकर्षक विद्युत रोषणाई, रांगोळ्या आणि फटाक्यांच्या आतषबाजीने पालखीचे स्वागत केले. सुवासिनींनी देवींची आरती करून ओट्या भरल्या. यानंतर, गावच्या परंपरेनुसार पालखी प्रत्येक ग्रामस्थाच्या दारात नेण्यात आली, ज्याला 'भोवनी' असे संबोधले जाते. या काळात भक्तांनी नवस बोलणे आणि फेडण्याचे धार्मिक विधी पूर्ण केले. अहोरात्र चालणाऱ्या या उत्सवात भाविकांच्या दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे उघडे ठेवण्यात आले होते. 'रुपी भंडारुन' या विधीने उत्सवाची सांगता झाली. पावित्र्याचे भान राखून आणि संस्कृतीची शान वाढवत टेरवच्या ग्रामस्थांनी हा उत्सव आदर्शवत पार पाडला. या सोहळ्यासाठी मुंबईसह विविध शहरांतून चाकरमानी आपल्या गावी दाखल झाले होते.
konkansamwad 
