खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस होणार भव्यदिव्य......सोहळ्यासाठी राज्य व केंद्रातील दिग्गज नेते राहणार उपस्थित
कणकवली
कोकणचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी कणकवली येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे वर्ष 'अमृत महोत्सवी पदार्पण वर्ष' म्हणून साजरे करण्याचा निर्णय महायुतीच्या वतीने घेण्यात आला असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.या सोहळ्यासाठी राज्य व केंद्रातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती लाभणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.थोडक्यात राणेंच्या वाढदिवसाला केंद्रासह राज्याच अर्ध मंत्रिमंडळ बैठक उपस्थित राहणार आहे. विशेष आकर्षण म्हणून बॉलिवूड अभिनेते संजय दत्त यांची उपस्थिती राहणार असून, कार्यक्रमानंतर प्रसिद्ध गायक सोनू निगम यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे.दरम्यान, या वाढदिवसानिमित्त एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. नारायण राणे यांनी चाहत्यांना आणि कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छ न देता पुस्तके भेट देण्याचे आवाहन केले आहे. संकलित पुस्तके विविध ग्रंथालयांना दान करण्यात येणार असून, कोकणातील वाचन संस्कृतीला चालना देणे हा यामागचा उद्देश आहे.अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. दर महिन्याच्या १० तारखेला हे कार्यक्रम पार पडतील, ज्यामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे.हा भव्य सोहळा १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदान, कणकवली येथे पार पडणार असून, कार्यक्रमासाठी विशेष आसन व्यवस्था करण्यात आली आहे. कोकणातील जनतेत या कार्यक्रमाबद्दल मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
konkansamwad 
