सिंधुदुर्गात प्रथमच रंगणार नागेश आडगावकर यांची 'स्वरसंध्या' मैफील....निरवडे महोत्सवात स्वरांचा अभिषेक 

सिंधुदुर्गात प्रथमच रंगणार नागेश आडगावकर यांची 'स्वरसंध्या' मैफील....निरवडे महोत्सवात स्वरांचा अभिषेक 

सावंतवाडी

 

    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक पटलावर एक सुवर्णक्षण मानावा असा कार्यक्र  निरवडे येथे पार पडणार आहे. पुणे येथील ख्यातनाम शास्त्रीय गायक नागेश आडगावकर यांच्या विशेष सांगीतिक मैफिलीचे आयोजन करण्यात आले असून, अशा प्रकारचा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलाच मोठा कार्यक्रम ठरणार आहे. निरवडे ग्रामस्थ आणि श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'निरवडे महोत्सव २०२६' अंतर्गत या 'स्वरसंध्या' कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. निरवडे येथील माळकरवाडी येथे हा कार्यक्रम रंगणार आहे. शास्त्रीय संगीतातील आपल्या अवीट गोडीने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे नागेश आडगावकर सिंधुदुर्गात पहिल्यांदाच आपली कला सादर करणार असल्याने स्थानिक रसिक प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाला साजेशी अशी साथसंगत लाभणार असून यामध्ये हार्मोनियमवर  वैष्णव देवसरकर, पखवाजसाठी  मनीष तांबोसकर, तबल्याची साथ  रोहन पंढरपूरकर तर गायन साथ शुभम बोरकर करणार आहेत. निरवडे महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित ही सांगीतिक मेजवानी कोकणातील कानसेन आणि संगीत प्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. निरवडे ग्रामस्थांनी या ऐतिहासिक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून शास्त्रीय संगीताचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे जिल्ह्याच्या कला आणि सांस्कृतिक क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.