घुमडे येथील पर्यटन स्थळांवर गैरवर्तन, मद्यपान करून पार्ट्या करणाऱ्यांवर कारवाई करा. नांदरुख, घुमडे सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह महिला व ग्रामस्थांची मालवण पोलीस प्रशासनाकडे मागणी.

घुमडे येथील पर्यटन स्थळांवर गैरवर्तन, मद्यपान करून पार्ट्या करणाऱ्यांवर कारवाई करा.  नांदरुख, घुमडे सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह महिला व ग्रामस्थांची मालवण पोलीस प्रशासनाकडे मागणी.

मालवण.

   नांदरुख, घुमडे गावातील ओहोळात ग्रामस्थांनी स्वखर्चातून गणपती विसर्जनासाठी गणेश कोंड बांधल्या आहेत. याठिकाणी तसेच घुमडे गाव हद्दीतील भारत गॅस गोडाऊन बाजूला असलेल्या धबधब्याच्या ठिकाणी शहरातील व बाजूच्या गावातील लोक येऊन पार्ट्या करतात. दारू पिऊन गैरवर्तन करतात. यासाठी गावात गस्त वाढवावी, गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,अशी संतप्त मागणी नांदरुख, घुमडे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच महिला व ग्रामस्थांनी मालवण पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
   निवेदनात म्हटले आहे, साळकुंभावाडी, घुमडे गावामध्ये ओहोळात ग्रामस्थांनी स्वखर्चातून गणपती विसर्जनासाठी तयार केलेली गणेश कोंड आहे. येथे शहरातील व बाजूच्या गावातील लोके येऊन पार्ट्या करतात.दारू पिऊन अश्लील वर्तन करतात. शाळकरी, कॉलेजच्या  मुलींना मोठ्या प्रमाणात त्रास दिला जातो. महिलांसमोर गैरवर्तन केले जाते. गावातील महिलांनी पुढाकार घेत सदर ठिकाणी कुंपण घातले. तसेच या ठिकाणी कोणीही आंघोळ, दंगा, पार्ट्या  करू नये अशा आशयाचा फलक लावला. मात्र कुंपण तोडून आत घुसून पार्ट्या अंघोळ, दंगा सुरू असतो. तरी आपण या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन हे प्रकार बंद होणासाठी योग्य ती कार्यवाही करून प्रसंगी कठोर कारवाई करावी. या परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी. ग्रामस्थांच्यावतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी मागणी मालवण पोलीस प्रशासनासकडे केली आहे.
   यावेळी पोलिसांनीही गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. यावेळी नांदरुख, घुमडे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.