जनतेच्या समस्यांचे जलद निवारण करणे हे माझे कर्तव्य - नितेश राणे

जनतेच्या समस्यांचे जलद निवारण करणे हे माझे कर्तव्य - नितेश राणे

 

सिंधुदुर्गनगरी

 

    जनतेच्या अडचणी दूर करणे आणि त्यांच्या प्रश्नांना त्वरित न्याय मिळवून देणे हे पालकमंत्री म्हणून माझे प्राथमिक कर्तव्य आहे. प्रशासन अधिक लोकाभिमुख व्हावे आणि सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठीच आम्ही थेट जनतेच्या दारी जाऊन संवाद साधण्यावर भर देत आहोत, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री कक्षात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये त्यांनी जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली निवेदने सादर केली. यामध्ये शेतजमिनीचे वाद, वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत, अनाव परिसरातील गाळ काढणे आणि दिव्यांग कल्याण योजनेचे लाभ मिळवून देणे अशा विविध मागण्यांचा समावेश होता. या सर्व निवेदनांची गांभीर्याने दखल घेत पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी दिव्यांग बांधवांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली असता, जिल्ह्यातील दिव्यांगांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ प्राधान्याने मिळवून दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. तसेच ग्रामसेवक संघटनेच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी लवकरच सर्व ग्रामसेवकांची स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.